केज : संतोष देशमुख हत्या प्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडीच्या ताब्यात असलेला आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराड याला आज (दि. १४) रोजी खंडणीच्या गुन्ह्यात केज न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज दुपारी १२:३० वा सुमारास मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडची आवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणी सीआयडी कोठडी संपली. त्याला के ज येथील न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, सोमवारी (दि. १३) रोजी वाल्मीक कराड याच्यावर हत्या आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करण्यात आले होते. म्हणून वाल्मीक कराड याला बीडहून घेऊन येताना पोलिसांनी त्याला मांजरसुंबा-नेकनुर-मस्साजोग मार्गे न घेऊन येता त्याला वडवणी-धारूर मार्गे केज येथे आणण्यात आले. त्यानंतर दुपारी १२:३० वा. च्या सुमारास वाल्मीक याला केज येथील कनिष्ठ न्यायालयात हजर केले. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांच्या वतीने ॲड. जितेंद्र शिंदे यांनी बाजू मांडताना आरोपीची सीआयडी कोठडीची मागणी केली.
दरम्यान, यावर आक्षेप घेत आरोपीचे वकील ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी आरोपीचा न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्या नुसार न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याच्या जामिनीचा अर्ज न्यायालयासमोर सादर केला होता.
त्या नंतर एसआयटीच्या पथकाने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात त्याचा अर्ज सादर करून वाल्मीक याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंधित गुन्ह्यात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्याचा ताबा मागितला. त्या नंतर एसआयटीच्या पथकाने त्याचा ताबा घेतला. वाल्मीक याला दि. १५ रोजी एसआयटी पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.
दि. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण होता आणि नेमके याच दिवशी खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. आणि त्याचा जामीन अर्ज देखील न्यायालयात सादर केलेला असताना एसआयटीने त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत त्याला ताब्यात घेतले.
" माझा भाऊ संतोष देशमुख यांच्या हत्येशी आणि पवन चक्कीच्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात सर्व आरोपींवर कठोर कारवाई होवून त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. तसेच तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करीत असून काही आक्षेप नाही. तसेच एसआयटी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक बसवराज तेली यांनी आम्हाला तपास संदर्भात माहिती अवगत केली आहे."धनंजय देशमुख, (सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ)
" संतोष देशमुख यांच्या हत्येशी सबंधित मास्टर माईंड वाल्मीक कराड याला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई होणार आहे. आमच्या न्यायाच्या मागणीसाठी प्रसिद्धी माध्यमांनी खूप सहकार्य केले. तसेच गावातील प्रत्येक नागरिकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येने व्यथित झाले असून सर्वजण महिन्या पेक्षा जास्त काळा पासून सोबत आहेत."बबलू देशमुख