Santosh Deshmukh Murder case Beed Court Hearing:
बीड : संतोष देशमुख खून प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर मंगळवारी तब्बल ३ तास युक्तिवाद झाला. तिन्ही गुन्हे वेगवेगळे असल्याचा दावा कराडच्या वकिलाने केला. मात्र, या प्रकरणात एकत्रित चार्जशीट करता येते, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या MCOCA अंतर्गत पुराव्याबाबत शंका व्यक्त करत, या कायद्यानुसार आरोपीविरोधात पूरक पुरावे अपुरे आहेत, असा युक्तिवाद कराड याच्या वकिलाने केला. दरम्यान, सरकारी पक्षाच्या वतीने मुंबई बॉम्बस्फोट तसेच २६/११ हल्ल्याचा संदर्भ देत या प्रकरणात वेगवेगळे गुन्हे होते तरीदेखील एकत्रित चार्जशीट करण्यात आली, असा संदर्भ देण्यात आला. त्यामुळे याही प्रकरणात एकत्रित चार्जशीट करता येते, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. कराड याच्या वकिलाकडून मात्र हे तिन्ही गुन्हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असल्याचा पुनरूच्चार केला. त्यामुळे एकत्रित चार्जशीट होऊ शकत नाही. इतर दोन गुन्ह्यांची सुनावणी केज येथील न्यायालयात व्हावी, असा युक्तिवाद केला.