केज : संतोष देशमुख यांचा हत्याकांड दुर्दैवी असून मास्टर माईंडला वाचविले जात असल्याचा आरोप रोहीत पवार यांनी सरकारवर केला. तर याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली. कारण एसआयटी आणि निव्वळ वेळकाढूपणा असून अशा प्रकारच्या अनेक चौकशा होतात. परंतु पुढे काय होते हे आपण पाहिले आहे. असे ते म्हणाले. तसेच याचा तपास करण्यासाठी मुंख्यमंत्र्यानी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
आ. रोहित पवार हे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमख यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या सोबत माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ. सय्यद सलीम, सक्षणा सलगर, राजेसाहेब देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, संजीवनी देशमुख, राधाताई सकपाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. रोहित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची चौकशी ही निवृत्त न्यायाधीश किंवा एखाद्या निःपक्षपातीपणे काम करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्या मार्फत केली जावी. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हे या हत्याकांडातील मास्टर माईंड आहेत. त्या मास्टरमाईंड वाल्मीक कराड यांना वाचविण्यासाठी येथील सत्ताधारी काम करीत असल्याचा जळजळीत आरोप त्यांनी केला.
आ. रोहित पवार यांनी संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी, मुलगी कु. वैभवी व मुलगा चि. विराज आणि आई शारदा आणि वडील पंडितराव देशमुख यांचे सांत्वन केले. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला उघडे पडू देणार नसून त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी ते घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.