बीड : जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी ४२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मात्र, याच महामार्गांवरील निकृष्ट कामांमुळे आणि सुरक्षिततेच्या अभावामुळे गेल्या दीड वर्षात ६०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला असून, या अपघातांची जबाबदारी श्रेय घेणार का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर ते लोखंडी सावरगाव आणि माजलगाव ते केज दरम्यानच्या धारूर घाटातील रस्त्यांसाठी निधी मंजूर केला. यानंतर, ही कामे आपणच मंजूर करून आणल्याचा दावा करत माजी खासदार प्रीतम मुंडे आणि विद्यमान खासदार बजरंग सोनावणे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
मात्र, डॉ. ढवळे यांनी या राजकीय दाव्यांमागची काळी बाजू समोर आणली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये याच रस्त्यांवर झालेल्या अपघातांमध्ये ४५९ जणांना प्राण गमवावे लागले, तर यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांतच १५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते, रखडलेली कामे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि अपघातप्रवण स्थळांकडे केलेले दुर्लक्ष यांमुळे हे बळी गेले आहेत.
डॉ. ढवळे यांच्या मते, जिल्ह्यातील महामार्गांवर तब्बल ४० ‘ब्लॅक स्पॉट’ (अतिधोकादायक अपघातप्रवण स्थळे) आहेत. रस्त्यांच्या निकृष्ट कामांबद्दल आणि वाढत्या अपघातांबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवला, निवेदने दिली, आंदोलने केली, तेव्हा हेच लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प होते. त्यांच्या मते, अनेक समस्या आजही कायम आहेत:
निकृष्ट काम : उद्घाटनापूर्वीच रस्त्यांना तडे आणि भेगा पडत आहेत.
सुरक्षेचा अभाव : अपघातप्रवण वळणांवर गतिरोधक किंवा सूचना फलक नाहीत.
रखडलेली कामे : अनेक रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण झालेली नाहीत.
आता निवडणुका तोंडावर आल्याने केवळ श्रेय घेण्यासाठी पत्रकबाजी सुरू आहे. ज्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केले, त्यांनीच या अपघाती मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.