गौतम बचुटे : केज
संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे. या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दि. ३० डिसेंबर रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दीपक कांबळे यांच्यासह रिपाईचे नेते उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी आहे. तसेच या घटनेपूर्वी पवन ऊर्जा प्रकल्पात घडलेल्या घटनेची येथील सुरक्षारक्षकाच्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली असती, तर कदाचित ही घटना टाळता आली असती. म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त होत आहे. सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे हा सोलार प्रकल्पात काम करीत होते. त्यांना मारहाण झाल्यामुळे संतोष देशमुख हे भांडण सोडवायला गेले होते. त्यामध्ये ॲट्रॉसिटी लावणे अत्यंत आवश्यक होते. जर ॲट्रॉसिटी लावली असती आणि आरोपींना पकडले असते, तर ही घटनाच घडली नसती. यामुळे पोलीसांवर लोकांचा संशय आहे. हे अत्यंत गंभीर आहे. केज आणि बीड येथील पोलिसांवर लोकांचा संशय आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली झालेली आहे. नवीन आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालावे. यासंदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे असे रामदास आठवले म्हणाले.
या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून उर्वरित सर्व आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात यावे. सर्व आरोपी आणि त्याचा सूत्रधार यांच्या अटकेची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.