बीड : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन वाळू घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) तपासाला वेग दिला असून बुधवारी विशेष पथकाने दिवसभर चौकशीचे सत्र राबवले. या कारवाईत पथकप्रमुख, आठ अधिकारी, डेप्युटी कलेक्टर आणि पथकातील तहसीलदार अशा एकूण १२ अधिकाऱ्यांचे सविस्तर लेखी जबाब नोंदविण्यात आले. ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच चौकशी सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी घरकूल योजनेतील गरीब लाभार्थ्यांच्या ओटीपीचा गैरवापर करून हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा झाल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात १९ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर कारवाईचा वेग वाढला आहे. वाळू माफियांशी संगनमत करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या तसेच या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकारी किंवा संबंधित व्यक्तीची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या चौकशीमधून दिला जात असल्याचे बोलले जात आहे.