गौतम बचुटे
केज :- मुले सांभाळ करीत नाहीत, उपजिविकेचे साधन नाही आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने औषधोपचार करण्यासाठी पैसे नाहीत म्हणू न मला आत्महत्येची किंवा इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केज तालुक्यातील एका ७५ वर्षाच्या वृद्धाने विभागीय दंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.
केज तालुक्यातील वसंत भगवान पारखे हे ७५ वर्ष वयाचे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना त्यांचा शिक्षक असलेला मुलगा संतोष पारखे हा सांभाळीत नसून त्याने वसंत पारखे यांना त्याच्या घराबाहेर हाकलून दिले म्हणून वसंत पारखे यांनी मुलाकडून त्यांच्या उपजिविकेसाठी आणि औषधोपचारासाठी व देखभालीसाठी पोटगी मिळण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे मागील वर्षी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आठ महिन्या पूर्वी अर्ज दाखल केला आहे.
मात्र अद्याप त्यावर उपविभागीय दंडाधिकारी यांनी निर्णय न दिल्याने त्यांना दररोज मधुमेह आणि उच्च रक्तदाब याच्या गोळ्या आणि औषधी घेतल्या शिवाय जगू शकत नाही. सध्या ते त्यांची उपजिवीका आणि औषधोपचार याचा खर्च उधारीवर करीत आहे. त्यांना उधारी व देणे जास्त झाल्याने आणि जवळ पैसे नसल्याने औषधोपचार बंद करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे जर मुलाकडून लवकरात लवकर पोटगी मिळणे संदर्भात आदेश निघाला नाही, तर अन्नपाणी आणि औषधोपचारा शिवाय तडफडून मरण्या पेक्षा आत्महत्या किंवा आपण मला इच्छा मरणाची परवानगी वसंत पारखे यांनी दि. २५ मे ३०२६ रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे मागितली आहे.
माझ्या नावे असलेली जमीन मी माझ्या पत्नीच्या नावे करताच मुलगा आईला सोबत घेऊन अंबाजोगाई येथे राहत आहे. मात्र मला त्याने घरातून हाकलून दिल्याने मी पोटगीचा अर्ज केला परंतु आठ महिन्या पासून मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता जगणे असह्य होत असल्याने मी आत्महत्या किंवा इच्छामरणाची मागणी केली आहे.वसंत भगवान पारखे, साळेगाव ता. केज