Beed financial fraud case
गेवराई : शेत तलाव दुरुस्तीचे काम करून मोठा नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवत तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील धनंजय दिनकर धसे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय, पैशांची मागणी करताना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण चकलांबा पोलिस ठाण्यात नोंद झाले असून पोलिस तपास सुरू आहे.
फिर्यादी भरत नवनाथ खेडकर (रा. वडाचीवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २००६ साली धनंजय धसे यांची ओळख शेततलावाच्या कामानिमित्त झाली होती. नंतर २०१६ मध्ये धसे गावात आल्यानंतर त्यांनी तलावातील जमिनीबाबत मोबदला मिळवून देण्याचे तसेच शेततलाव दुरुस्ती आणि गाळ उपसण्याचे ५० लाख रुपयांचे काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
त्यासाठी धसे यांनी खेडकर यांना सांगितले की, “तुम्ही १३.५ लाख द्या, मी तुम्हाला १५ लाख परत देतो, तसेच काम पूर्ण झाल्यावर १० ते १२ लाखांचा नफा देतो.” या आश्वासनावर विश्वास ठेवून खेडकर यांनी वेळोवेळी रोख आणि बँकेतून एकूण १३.५ लाख रुपये दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतर काम सुरू झाले नाही. पैशांची परतफेड करण्यास धसे यांनी नकार दिला. उलट, वारंवार पैशाची मागणी करताना त्यांनी फोनवर “माझ्याकडे पिस्तुल आहे, जीव घेऊ शकतो” अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आर्थिक फसवणूक आणि जीवघेणी धमकी दिल्याचा गुन्हा धसे यांच्यावर दाखल करण्यात आला असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत.