Indian Railways file photo
बीड

Pune Beed Express : पुणे-बीड दरम्यान नवी दैनंदिन एक्सप्रेस मंगळवारपासून

२२ सप्टेंबरपासून सेवा; ३२६ किमी अंतर ७ तास १५ मिनिटांत

पुढारी वृत्तसेवा

बीड : पुणे आणि बीडदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आणि या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाने पुणे-बीड दरम्यान नवीन नियमित दैनंदिन एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. गाडी क्रमांक ११४३३ पुणे-बीड एक्सप्रेसची नियमित सेवा मंगळवार, दि. २२ सप्टेंबरपासून, तर गाडी क्रमांक ११४३४ बीड-पुणे एक्सप्रेसची सेवा बुधवार, दि. २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

गाडी क्रमांक ११४३३ पुणे-बीड एक्सप्रेस दररोज रात्री १०.४५ वाजता पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता बीडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ११४३४ बीड-पुणे एक्सप्रेस दररोज रात्री ९.३० वाजता बीडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी पुणे ते बीड दरम्यान ३२६ किलोमीटरचे अंतर कापणार आहे. पुणे-बीड प्रवासासाठी ७ तास १५ मिनिटे, तर बीड-पुणे प्रवासासाठी ७ तास ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

नवीन एक्सप्रेस १५ एलएचबी डब्यांसह धावणार आहे. यामध्ये एक एसी टू-टियर, दोन एसी थ्री-टियर, सहा स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास, एक सेकंड क्लास लगेज/ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कारचा समावेश आहे.

पुणे-बीड एक्सप्रेसला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोह, न्यू आष्टी आणि अमळनेर भंड्याचे येथे थांबे देण्यात आले आहेत.

२० सप्टेंबरपासून आरक्षण

गाडी क्रमांक ११४३३ आणि ११४३४ चे आरक्षण रविवार, दि. २० सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत पीआरएस तिकीट केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

काही गाड्यांच्या वेळेत बदल

नवीन दैनंदिन एक्सप्रेस सुरू होत असल्याने परिचालनाच्या दृष्टीने काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.

पुणे-अमरावती एक्सप्रेस : गाडी क्रमांक ११४०५ची २५ सप्टेंबरपासून पुणे येथून सुटण्याची वेळ रात्री १०.५५ करण्यात आली आहे. यापूर्वी ही गाडी रात्री १०.४५ वाजता सुटत होती. दौंड येथे या गाडीचा थांबा रात्री १२.२८ ते १२.३० असा असेल. इतर स्थानकांच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही.

पुणे-सोलापूर एक्सप्रेस : गाडी क्रमांक ११४१७ची २२ सप्टेंबरपासून पुणे येथून सुटण्याची वेळ रात्री ११.०५ करण्यात आली आहे. यापूर्वी ही गाडी रात्री ११ वाजता सुटत होती. दौंड येथे रात्री १.२५ ते १.३० असा थांबा असेल. इतर स्थानकांच्या वेळेत बदल नाही.

पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस : गाडी क्रमांक १६३८१ची २२ सप्टेंबरपासून वेळ बदलण्यात आली आहे. पुणे येथून ही गाडी रात्री ११.२० वाजता सुटेल. यापूर्वी सुटण्याची वेळ रात्री ११.४५ होती. दौंड येथे रात्री १२.२० ते १२.२५, कुर्डुवाडी येथे पहाटे २.०३ ते २.०५ आणि सोलापूर येथे पहाटे ३.२० ते ३.२५ असा थांबा असेल.

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी संबंधित गाडीच्या आगमन आणि प्रस्थानाच्या अद्ययावत वेळा भारतीय रेल्वेच्या चौकशी पोर्टलवर किंवा अधिकृत NTES ॲपवर तपासून घ्याव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT