Beed News : बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा करा file photo
बीड

Beed News : बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा करा

आ. संदीप क्षीरसागर यांच्या सूचना; अतिरिक्त भार मंजुरीसाठी कार्यवाहीचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Provide smooth water supply to Beed city

बीड, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बीड शहरातील पाणीटंचाई आणि पाणीपुरवठा नियोजनाबाबत आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत बीड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला प्रलंबित असलेला अतिरिक्त वीजभार मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यावर सविस्तर चर्चा झाली.

अतिरिक्त वीजभारचा मार्ग मोकळा झाल्यानंतर बीड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होऊन दुष्काळाचा सामना करण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे बीड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला अतिरिक्त वीजभार मंजूर करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आ. क्षीरसागर यांनी दिले आहेत.

बीड शहराची अंदाजित लोकसंख्या 2 लाख 65 हजार असून, शहराला दररोज 36 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. या 36 दशलक्ष लिटर पैकी 28 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा माजलगाव धरणातून, तर उर्वरित 8 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा बिंदुसरा धरणातून केला जातो. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे बिंदुसरा धरणातील पाणीसाठा अपुरा झाला असून तो लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बीड शहराचा पाणीपुरवठा आता पूर्णपणे माजलगाव धरणावर अवलंबून राहणार आहे. बीड शहराच्या अमृत अटल योजनेला वीज जोडणी आणि जुन्या योजनेला अतिरिक्त वीजभार नसल्याने पाणीपुरवठा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. माजलगाव धरण येथील बीड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची क्षमता प्रतिदिन 50 दशलक्ष लिटर इतकी आहे. तसेच माजलगाव धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून संपूर्ण यंत्रणाही कार्यान्वित आहे.

परंतु, नगर परिषदेकडे विद्युत बिलाची 60 कोटी रुपये इतकी थकबाकी असल्याने आवश्यक असलेला अतिरिक्त विद्युत भार मंजूर होत नाही. परिणामी, सद्यस्थितीत बीड शहराला 15 दिवसांना होणारा पाणीपुरवठा आता 20 ते 25 दिवसांवर जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बीड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम पाणीपुरवठा योजनेला अतिरिक्त वीजभार मंजूर होणे आवश्यक असल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

यावर तातडीने उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची आधार घेऊन थकीत वीजबिलाची मूळ रक्कम 36 कोटी रुपये भरण्यासाठी 16 वा वित्त आयोग आणि जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करून अमृत अटल योजनेला नवीन वीज कनेक्शन किंवा अतिरिक्त वीजभार मंजूर करून योजना कार्यरत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवण्याबाबत संबंधित अधिकारी यांना आ. क्षीरसागर यांनी बैठकीत निर्देश दिले आहेत.

तसेच यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार शहरातील बार्शी नाका येथे सुरू असलेल्या बिंदुसरा नदीवरील लवकरच पूर्णत्वास येणार्या पूल कम बंधार्याच्या बॅकवॉटर मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग चा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची संकल्पना आ. संदीप क्षीरसागर आणि माजी आ. सय्यद सलीम यांची आहे. याचा प्रस्ताव तातडीने वरीष्ठ पातळीवर पाठविण्याचे निर्देशही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT