Professor Laxman Hake's criticism while entering Gevrai
गेवराई : गेवराईचा मुरकुल्या आमदार चौथी पास खुळखुळ्याला पाठिंबा देतो. आम्ही तुम्हाला मतदान केले नाही का ? आम्हाला सांगता चार वेळेस आम्ही आमदार झालो म्हणून, पण कोणाच्या मतांवर झाले ते पण सांगा.. आता यापुढे असे प्रकार चालणार नसल्याचा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला.
गेवराई शहरात प्रा. हाके यांचे ओबीसी समाज बांधवांनी उत्साहात स्वागत केले. सोलापूर-धुळे महामार्गावर वाहनांचा ताफा थांबवत त्या ठिकाणाहून दुचाकी रॅली काढण्यात आली. गेवराई शहरातील प्रमुख मार्गांवरून बाग पिंपळगाव येथे पोहोचली. या ठिकाणी प्रा. हाके यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. येथे प्रा. हाके म्हणाले की, आमचे आरक्षण काढून घेण्यात आले आहे. जरांगे यांच्या झुंडशाही पुढे सरकार झुकले आणि आपले आरक्षण काढून घेण्यात आले, परंतु याच्याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत.
गावागावांत ओबीसींमध्ये जनजागृती करून एकसंध करण्यात येणार आहेत. आम्ही आजवर तुमची झुंडशाही सहन केली, परंतु यापुढे सहन करणार नाही. तुम्हाला जी भाषा समजत असेल त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार आहोत. तुम्ही मला कुत्रा म्हणालात, परंतु आमच्या धनगर बांधवांच्या खंडोबाचा वाघ्या नावाचा कुत्रा असतो, तुम्हाला त्याचे काय महत्त्व कळणार. तुम्ही गेवराई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहात. तुम्ही सर्वांच्या हिताची भाषा बोलली पाहिजे, परंतु केवळ एका समाजासाठी आंदोलन करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहता हे न शोभणारे आहे. गेवराई काय मी बारामतीमध्येही सभा घेऊन आलो आहे. त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही. तुम्हीही कोणाला घाबरू नका, असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी यावेळी केले.
प्राध्यापक लक्ष्मण हाके सोलापूर-धुळे महामार्गावरील मांजरसुंबा येथील चौकामध्ये आले असता त्या ठिकाणी ओबीसी समाज बांधवांकडून त्यांचे स्वागत केले गेले. यावेळी हाके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. परंतु त्या ठिकाणी काही मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणाहून पुढे निघून गेल्यानंतर ओबीसी समाज बांधवांनी आक्रमक होत रास्ता रोकोचाही प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर काही दिवसांपूर्वीच्या गेवराई येथील दौऱ्यामध्ये हल्ल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर लक्ष्मण हाके हे रविवारी गेवराई शहरात दाखल झाले. गेवराईच्या बाहेर त्यांचे स्वागत करत शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी झालेले ओबीसी समाज बांधव मोठ्या प्रमाणात घोषणाही देत होते.