Prajakta Dhas pudhari photo
बीड

Prajakta Dhas : ‘खोटं बोल पण रेटून बोल’, हेच बाळासाहेब आजबेंचे धोरण

प्राजक्ता धस यांचा पलटवार; अब्रुनुकसानीच्या दाव्याचे स्वागतच करणार

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : बाळासाहेब आजबे यांचे ‌‘खोटं बोल, पण रेटून बोल‌’ असे धोरण आहे. मी केलेल्या एकाही आरोपाचे त्यांनी उत्तर दिलेले नाही. त्यांनी जमीन घेतलेल्या गावांची यादी सांगितली; मात्र त्यातील एकाही गावातील जमिनीबाबतचे कागदपत्र दाखविले नाही. माझी बदनामी करून उलट माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असतील, तर त्या दाव्याचे मी स्वागतच करीन, असा जोरदार प्रतिहल्ला प्राजक्ता धस यांनी केला.

आष्टी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी सुवर्णाताई गिऱ्हे, शीतल कर्डिले आणि आशा करांडे उपस्थित होत्या. आष्टी येथील सर्व्हे क्रमांक १७६ आणि १७७ या जमिनी पूर्वीपासूनच वर्ग-१ स्वरूपाच्या असून त्या खिदमतमास वर्गातील नसून मदतमास वर्गातील होत्या. त्यामुळे या जमिनींची रीतसर खरेदी करण्यात आली आहे.

याबाबत कोणाचीही तक्रार नसल्याचा दावा धस यांनी केला. राघापूर येथील जमिनीबाबतही संबंधितांकडे नियमाप्रमाणे आवश्यक असलेले ३२-ग प्रमाणपत्र नसल्यामुळे कुळ हक्क सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे ती जमीनही मालकांकडून रीतसर खरेदी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजबे यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेली कागदपत्रेही चुकीची आहेत, असा आरोप करत धस म्हणाल्या, तवलवाडी आणि वाळुंज ही गावे जवळ आहेत. वाळुंज येथील रघुनाथ पवार हे आमचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी फोन केल्यानंतर मी त्या ठिकाणी गेले होते. मात्र, या घटनेबाबत मोठे षडयंत्र रचण्यात आले होते आणि ते नंतर सिद्ध झाले.

‘अदृश्य हातांमुळेच आमदार झालात’

बाळासाहेब आजबे यांच्या राजकीय वाटचालीवरही धस यांनी टीका केली. तुम्ही बाजारातून आला नाहीत, असे म्हणता; पण अदृश्य हातांमुळेच तुम्ही आमदार झाला होता. पाच वर्षे स्वतःच्याच प्रगतीत गुंतल्यामुळे मतदारसंघात अपेक्षित काम झाले नाही. त्यामुळे पाच वर्षांत एक लाख मते अदृश्य झाली आहेत. या मुद्द्यावर आपण काहीही उत्तर दिलेले नाही आणि देऊही शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

दुष्काळी मोर्चाच्या मुद्द्यावरही त्यांनी आजबे यांना सुनावले. दुष्काळी मोर्चात माझे नाव घेतले नाही, असे तुम्ही म्हणता. मात्र, कोणत्याही महिलेचे नाव घेतले तरी ते मी सहन करणार नाही, असा इशाराही धस यांनी दिला.

‘अनिशा ग्लोबल शाळा आमच्या कुटुंबाची नाही’

पिंपळेश्वर देवस्थान संस्थानच्या मालकीच्या अनिशा ग्लोबल शाळेबाबतही आजबे यांनी केलेल्या आरोपांना धस यांनी प्रत्युत्तर दिले. अनिशा ग्लोबल शाळा पिंपळेश्वर देवस्थान संस्थानच्या मालकीची आहे. ती आमच्या कुटुंबाच्या मालकीची नाही. त्यामुळे आरोप करण्यापूर्वी बाळासाहेब आजबे यांनी याबाबत अधिक माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.एवढे करूनही बाळासाहेब आजबे माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असतील, तर त्या दाव्याचे मी स्वागतच करीन, असे सांगत प्राजक्ताताई धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘देवस्थानच्या जमिनीबाबत चुकीची कागदपत्रे दाखवू नका’

दादेगाव येथील रामचंद्र देवस्थानच्या जमिनीच्या मुद्यावरही धस यांनी भाष्य केले. दादेगाव येथील रामचंद्र देवस्थानला ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ आहेत. रामदास स्वामींनी येथील श्री प्रभू रामचंद्र आणि मारुती मंदिरातील देवतांची स्थापना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवस्थानच्या दिवाबत्तीसाठी शेकडो एकर जमीन दिली आहे, असे त्या म्हणाल्या. आपण आणि आपल्या शिराळ गावातील शेतकरी शेकडो एकर जमीन फुकट खात आहात. देवस्थानला दिलेल्या जमिनीबाबत चुकीची कागदपत्रे दाखवली जात आहेत. आपल्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे संबंधित शेतकरी देवस्थानला एक रुपयाचीही देणगी देत नाहीत. त्यामुळे मंदिरांची दुरवस्था झाली असून त्याला केवळ आपण जबाबदार आहात, असा आरोपही त्यांनी केला. देवस्थानच्या ट्रस्टी होण्यात आपल्याला कोणताही रस नसल्याचे स्पष्ट करत धस म्हणाल्या, पुरातन मंदिराचा विकास व्हावा, हा आमचा उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT