माजलगावात विश्वासघाताचे राजकारण pudhari photo
बीड

Majalgaon Municipal Politics : माजलगावात विश्वासघाताचे राजकारण

उपनगराध्यक्ष पदासाठी जगताप यांना डावलून चाऊस यांची सोळंकेंशी हातमिळवणी

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : माजलगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी निमित्ताने शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष, कुरघोडी आणि विश्वासघात या शब्दांना उधाण आले आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे सहाल चाऊस. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे नेते मोहन जगताप यांच्या पाठबळावर राजकारणात उभे राहिलेले सहाल चाऊस यांनी ऐनवेळी भूमिका बदलत उपनगराध्यक्ष पदासाठी थेट आ. प्रकाश सोळंके यांच्याशी हातमिळवणी केल्याने शहरभर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

ज्यांच्या खांद्यावर उभे राहून सत्ता मिळवली, त्यांनाच डावलण्याचा प्रकार केल्याने सहाल चाऊस यांच्यावर विश्वासघातकी राजकारणी असा ठपका लागला असून माजलगावच्या राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे नेते मोहन जगताप यांनी सहाल चाऊस यांच्या घरात थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती.

शहरातील अनेक प्रभागांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून चाऊस यांच्या मर्जीनुसार उमेदवार देण्यात आले. घरादारास व पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी सहाल चाऊस यांच्या सुनेला नगराध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी जीव ओतून प्रचार केला.निवडणुकीनंतर आ. प्रकाश सोळंके यांनी नगराध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रयत्न केला असताना, मोहन जगताप हेच ढाल बनून मैदानात उतरले होते.

निवडणूक प्रक्रियेपासून सत्तास्थापनेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर जगताप गटाने सहाल चाऊस यांना बळ दिल्याचे माजगावकरांनी पाहिले आहे.मात्र उपनगराध्यक्ष पदाची संधी दिसताच सहाल चाऊस यांनी आपली राजकीय भूमिका अचानक बदलली. जुन्या मैत्रीला तडा देत त्यांनी थेट ना. अजित पवार गटाशी संपर्क साधला आणि सत्ताकेंद्राशी जवळीक साधत आ. प्रकाश सोळंके यांच्याशी हातमिळवणी केली. स्वतः उपनगराध्यक्ष पद बळकावण्यासाठी घेतलेला हा ‌‘यू-टर्न‌’ म्हणजे राजकीय चातुर्य की उघड विश्वासघात, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी मोहन जगताप यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने संख्याबळाचे गणित चुरशीचे असताना, सहाल चाऊस यांच्या या अचानक भूमिकाबदलामुळे संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून गेले.आ. सोळंके यांच्याशी झालेली हातमिळवणी हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, यामागे मोठा राजकीय सौदा असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून निधी मिळवण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी ही सत्तासंधी स्वीकारली गेल्याचा आरोप केला जात आहे.

या घडामोडीनंतर सत्ता मिळाली की विचार बदलतात अशी टीकेची झोड सहाल चाऊस यांच्यावर उठू लागली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्याविषयी तीव्र नाराजी असून, कालपर्यंत ज्यांच्यासोबत उठबस, आज त्यांनाच पाठीवर वार अशी जहरी टीका होत आहे.मोहन जगताप समर्थकांकडून हा विश्वासघात माजलगाव तालुक्यातील जनता विसरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

  • या घडामोडीनंतर सत्ता मिळाली की विचार बदलतात अशी टीकेची झोड सहाल चाऊस यांच्यावर उठू लागली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्याविषयी तीव्र नाराजी असून, कालपर्यंत ज्यांच्यासोबत उठबस, आज त्यांनाच पाठीवर वार अशी जहरी टीका होत आहे.मोहन जगताप समर्थकांकडून हा विश्वासघात माजलगाव तालुक्यातील जनता विसरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT