पोलिस कॉन्स्टेबलवर गैरवर्तनाचा आरोप pudhari photo
बीड

Beed News : पोलिस कॉन्स्टेबलवर गैरवर्तनाचा आरोप

ग्रामस्थांची अप्पर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

धारूर : धारूर पोलिस स्टेशन हद्दीतील व अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा गावात 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलिस कॉन्स्टेबल विलास घुले यांनी उपसरपंच सुधाकर धोंडीराम इंगळे यांच्याशी गैरवर्तन, जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी सरपंच व ग्रामसेवक यांना चौकशीसाठी धारूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांना सुमारे पाच तास ठाण्यात थांबवून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. यावेळी उपसरपंच इंगळे यांनी विनाकारण त्रास दिला जात असल्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याशी अयोग्य भाषा वापरून धक्काबुक्की करण्यात आली तसेच कॉलर पकडून बाहेर ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना पोलीस ठाण्याच्या आवारात घडली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकार कैद झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेप्रकरणी सोनवळा येथील ग्रामस्थांनी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करत संबंधित कॉन्स्टेबलवर चौकशी करून निलंबन व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदक ओमकार नंदकिशोर पतंगे यांनी सांगितले की, योग्य कारवाई न झाल्यास पुढील चार दिवसांत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल.

राज्यात वाढत असलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असताना पदाचा गैरवापर करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT