बीड

"परळीची झालमुरी" आली फार्मात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आस्वाद

PM Narendra Modi Jhalmuri video | देशात झालमुरी सुसाट : परळीतही झालमुरीचा वाढता ट्रेंड

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्याकडेला उभे राहून ‘झालमुरी’चा आस्वाद घेतल्याचा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला. एका साध्या चुरमुऱ्याच्या पदार्थाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा रंगली. गावोगावी “झालमुरी”चे स्टॉल दिसू लागले, सोशल मीडियावर रेसिपी व्हायरल झाल्या आणि बंगालच्या या पारंपरिक पदार्थाला अचानक ग्लॅमर मिळाले.

आता मराठवाड्यातील आपल्या परळी वैजनाथची पारंपरिक “गर्डेल” परळीची झालमुरी म्हणून चर्चेत आली आहे. परळीची ही झणझणीत चव आता सोशल मीडियावरही लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात याच धर्तीवर अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा एक भन्नाट पदार्थ आधीपासूनच लोकप्रिय आहे. आणि त्याचं नाव आहे “गर्डेल”.परळी वैजनाथ परिसरात “गर्डेल” म्हणजे चुरमुरा, कांदा, मसाले, तेल, मिरची, शेंगदाणे आणि खास गुप्त फोडणी यांचं तिखट-चटकदार मिश्रण. एक प्रकारे हा “कच्चा चिवडा” म्हणूनही ओळखला जातो.

साधा दिसणारा हा पदार्थ चवीत मात्र एवढा भारी की, अनेक जण खास गर्डेल खाण्याचा आग्रह धरतात.विशेष म्हणजे, परळीतील आबा प्रोव्हिजन या दुकानातील “परळीची झालमुरी” सध्या ग्राहकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. तीन भावांनी चालवलेल्या या दुकानात खास मराठवाडी स्टाईलमध्ये बनणाऱ्या गर्डेलची चव इतकी वेगळी आहे की, बाहेरगावी गेलेले परळीकरदेखील पार्सल करून घेऊन जातात.

चुरमुरे, तिखट, मसाले, शेंगदाणे आणि खास बनवण्याची मराठवाडी पद्धत …हे सगळं मोठ्या परातीत एकत्र मिसळलं की तयार होते परळीची प्रसिद्ध “गर्डेल” अर्थात परळीची झालमुरी. पश्चिम बंगालची झालमुरी देशभर चर्चेत आल्यानंतर आता परळी वैजनाथमधील ही पारंपरिक चवही लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.परळीतील आबा प्रोव्हिजन या दुकानात तयार होणाऱ्या गर्डेलची चव सध्या ग्राहकांना भुरळ घालत आहे. तीन भाऊ चालवत असलेल्या या दुकानातील गर्डेल खाण्यासाठी अनेक जण आवर्जून तयार करून घेऊन जातात खमंग मसाल्याचा सुगंध… झणझणीत चव… आणि हाताने झपाझप मिसळली जाणारी ही गर्डेल…परळीकरांसाठी आता परळीची झालमुरी म्हणून एक ओळख बनली आहे.एकंदरीतच बंगालची झालमुरी राष्ट्रीय चर्चेत आली असली… तरी मराठवाड्याची परळी स्पेशल “गर्डेल” आता परळीची झालमुरी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे.

“मोदीजींनी झालमुरी खाल्ल्यानंतर लोकांमध्ये या प्रकारच्या पदार्थांची उत्सुकता वाढली… पण परळीमध्ये गर्डेल अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे… आमच्याकडून असंख्य परळीकर आवर्जून गर्डेल बनवून घेऊन जातात...लोकांची खुप पसंती आहे.मोदीजींनी झालमुरी खाल्ल्यानंतर तर परळीची झालमुरी म्हणूनच लोक येऊन हे बनवून घेऊन जात आहेत. ही चव परळीकरांच्या पसंतीला उतरली असुन सध्या गर्डेल अर्थात परळीची झालमुरीला मोठी मागणी वाढली आहे"
- आबा देशपांडे, संचालक, आबा प्रोव्हिजन परळी वैजनाथ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT