Pick-up and car collide near Cage toll plaza
केज : गौतम बचुटे
केज-बीड रोडवर गंगा माऊली साखर कारखाना असलेल्या टोल नाक्यापासून काही अंतरावर स्विफ्ट कार आणि पीक-अपचा अपघात झाला. यामध्ये आठजण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोन महिला, मुलगा व चार पुरूषांचा समावेश आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वाजता केज मांजरसुंबा रोडवर गंगा माऊली साखर कारखान्यास जवळ असलेल्या टोल नाक्यापासून सुमारे २०० मिटर अंतरावर एक भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार क्र. (एम एच-१४/एफ सी-२०३८) ही अंबाजोगाईत बीडच्या दिशेने जात होती. ती कार आणि पुण्याकडून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील त्यांच्या गावाकडे जात असलेल्या एका पिक-अप क्र. (एम एच १४/एच यु ७१४२) यांची समोरा-समोर धडक झाली.
या अपघातात पीकअपचे ड्राइव्हर साईडचे टायर तुटून पडले आहे. अपघातात स्विफ्ट मधील चौघे आणि पीक-अप मधील दोन महिला न दोन मुले असे एकूण आठजण जखमी झाले आहेत. त्यापैकी आवेज सुभान गवळी यांच्या हाताला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. जिजाबाई व्यंकट कानगुटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अलिफ शेख, महम्मद साबेर शेख, अझर आणि शोभा नाना कानगुटे यांच्यासह दोन मुले असे एकूण आठजण जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव आणि त्यांचे सहकारी हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेवून रस्ता सुरळीत केला, तर अँब्युलन्सचे पायलट बारगजे यांच्या मदतीने जखमी रुग्णांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.