पाटोदा : पाटोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरातील भलेमोठे व महाकाय वृक्ष तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, तोडलेल्या वृक्षांची विल्हेवाटही लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय कार्यालयांच्या परिसरात वर्षानुवर्षे सावली आणि पर्यावरणीय समतोल राखणारे वृक्ष कोणाच्या आदेशाने तोडण्यात आले, त्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच तोडलेल्या वृक्षांचे लाकूड नेमके कुठे नेण्यात आले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी पाटोदा येथील गणेश शेवाळे यांनी केली आहे.
शासनाकडून एकीकडे वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड आणि पर्यावरण संरक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे शासकीय कार्यालयांच्या आवारातील जुने, मोठे वृक्ष विकासकामांच्या नावाखाली तोडले जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. वृक्ष मोठे होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे एका बाजूला रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यासाठी शासन यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे तयार झालेली महाकाय झाडे तोडली जात असल्यास वृक्षसंवर्धनाच्या धोरणालाच छेद जात असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाटोदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरातील वृक्षतोडीसंदर्भात वनविभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित वृक्षतोडीस परवानगी देण्यात आली होती का, तोडण्यात आलेल्या वृक्षांची संख्या किती आहे, त्यांचे प्रकार कोणते, वृक्षतोडी संदर्भातील आदेश कोणी दिले, तसेच तोडलेले लाकूड कुठे नेण्यात आले आणि त्याची नोंद करण्यात आली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी आहे.
वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे किंवा नियमबाह्य पद्धतीने वृक्ष तोडल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी गणेश शेवाळे यांनी केली आहे. या प्रकरणात संबंधित विभाग आणि वनविभागाकडून प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केल्यानंतरच वृक्षतोड मागील नेमके कारण आणि त्यासाठी घेण्यात आलेल्या परवानग्यांचे वास्तव स्पष्ट होणार आहे.
“शासन एका बाजूला वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, तर दुसऱ्या बाजूला शासकीय कार्यालयांच्या आवारातील वर्षानुवर्षे वाढलेली महाकाय झाडे विकासाच्या नावाखाली तोडली जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. पाटोदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील वृक्ष कोणाच्या आदेशाने तोडण्यात आले, याची वनविभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा. वृक्षतोडीस परवानगी होती का, किती झाडे तोडण्यात आली आणि त्यांचे लाकूड कुठे नेण्यात आले, याची संपूर्ण चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”