पाटोद्यात घरफोडी; ऊसतोड मजुराचे कष्टाचे 9 लाख अन्‌‍ सोने लंपास File Photo
बीड

Beed Burglary Case : पाटोद्यात घरफोडी; ऊसतोड मजुराचे कष्टाचे 9 लाख अन्‌‍ सोने लंपास

जवळाला गावात चोरांचे तांडव; डीपीचा वीजपुरवठा खंडित करून दोन घरे फोडली

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यातील जवळाला गावात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत दोन घरे फोडली. यामध्ये पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरातील 9 लाख रुपयांची रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मुलाने ऊस तोडणीच्या कष्टांतून जमा केलेली पुंजी चोरीला गेल्याने कोठुळे कुटुंबियांनी टाहो फोडला असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी चोरांनी सार्वजनिक डीपीमधील फ्युज काढून संपूर्ण गाव अंधारात लोटले. वीजपुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कोठुळे यांच्या घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 9 लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी उठल्यावर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून कोठुळे कुटुंबाला चोरी झाल्याचे लक्षात आले.

गावातील वीजपुरवठा जाणीवपूर्वक खंडित करून घरफोडी करणे, ही पद्धत पाहता यामागे परिसरातीलच किंवा विद्युत कामाची माहिती असणाऱ्या एखाद्या जाणकार गुन्हेगाराचा हात असावा, असा संशय व्यक्त होत आहे.

पाटोदा पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी तात्काळ चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जवळाला ग्रामस्थांनी केली आहे.

माझ्या मुलाचे कष्टाचे पैसे परत द्या

“माझ्या मुलाने ऊस तोडणी करून मोठ्या कष्टाने हे पैसे कमावले होते. चोरांनी आमचे होत्याचे नव्हते केले, माझे पैसे मला परत मिळवून द्या,“ अशी आर्त साद कोठुळे कुटुंबातील महिलांनी घातली आहे. मजुरी करून साठवलेली रक्कम चोरीला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT