बीड : जिथे ज्ञानाचे धडे दिले जातात, त्याच विद्येच्या मंदिराला गुन्हेगारीचा अड्डा बनवल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात उघडकीस आला आहे. मांजेरी घाट येथील जिल्हा परिषदेच्या एका बंद शाळेच्या खोलीत बेकायदेशीरपणे साठवलेला तब्बल १४ लाख ४२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या (DYSP) पथकाने गुरुवारी छापा टाकून जप्त केला. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अशी झाली कारवाई
पाटोदा तालुक्यातील मांजेरी घाट येथील जिल्हा परिषदेची जुनी शाळा काही काळापासून बंद आहे. याच संधीचा फायदा घेत अशोक गीते नामक व्यक्तीने शाळेच्या एका खोलीचा वापर प्रतिबंधित गुटख्याच्या गोदामासाठी सुरू केला होता. याबाबतची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली.
त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, अंमळनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मांजेरी घाट येथील शाळेवर छापा टाकला. शाळेच्या खोलीचे कुलूप तोडून आत तपासणी केली असता, तिथे विविध कंपन्यांच्या गुटख्याचे आणि सुगंधित तंबाखूचे मोठे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी, गुटख्याची साठवणूक करणारा अशोक गीते याच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भाबड करत आहेत. शासनाने बंदी घातलेली असतानाही गुटख्याची सर्रास होणारी विक्री आणि वाहतूक हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच आता ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळांचा वापर अशा अवैध कामांसाठी होऊ लागल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचून मुख्य सूत्रधारांना अटक करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.