परळी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे भाविकांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत नगर परिषदेच्या स्थायी समितीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शहरात प्रत्येक सोमवारी मांसविक्री बंद ठेवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून या निर्णयाचे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
परळी हे भगवान वैद्यनाथाचे पवित्र क्षेत्र असल्याने देशभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त येथे दर्शनासाठी येत असतात. शहरात प्रवेश करताना ठिकठिकाणी दिसणाऱ्या मांसविक्री दुकानांबाबत विशेषतः सोमवारी तरी बंद ठेवावे, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती. अखेर या मागणीची दखल घेत नगर परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
दि. 20 एप्रिल रोजी नगराध्यक्षा तथा स्थायी समितीच्या अध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. यासोबतच नागरिकांना शासकीय वैद्यकीय योजनांचा लाभ सुलभ, वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी नगर परिषद कार्यालयात स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्यालाही मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस स्थायी समिती सदस्य वैजनाथ सोळंके, पवन मुंडे, जयश्री गित्ते, योगेश मेनकुदळे, अंजली माळी, उपमुख्य अधिकारी संतोष रोडे तसेच विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, धार्मिक भावना जपत घेतलेला हा निर्णय परळीच्या धार्मिक महत्त्वाला अधिक अधोरेखित करणारा ठरला असून, भाविकांच्या हिताचा व शहराच्या संस्कृतीशी सुसंगत असा हा ठराव असल्याचे मत व्यक्त होत आहे.
परळी वैजनाथ हे देशातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून येथे येणाऱ्या भाविकांच्या भावना जपणे ही आमची जबाबदारी आहे. अनेक वर्षांपासून नागरिक व शिवभक्तांकडून सोमवारी मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. शहराची पवित्रता, धार्मिक वातावरण आणि भाविकांचा सन्मान राखण्यासाठी हा ठराव महत्त्वाचा ठरेल, असे मत नगराध्यक्षा तथा स्थायी समितीच्या अध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.