परळी वैजनाथ : अधिकमासाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत मध्य प्रदेशातील भाविकांनी परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात तब्बल १५ फूट उंचीचे आणि सुमारे २०० किलो वजनाचे महाकाय त्रिशूल अर्पण केले आहे. तूर्तास हे त्रिशूल वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट कडे जमा करण्यात आले असून वैजनाथ देवस्थान ट्रस्टने या त्रिशूलची मंदिराच्या अग्रभागी अथवा योग्य ठिकाणी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे.
मध्य प्रदेशातील श्री चौरागड पंच कमेटी, छोटी बाजार, छिंदवाडा यांच्या वतीने हे त्रिशूल वैजनाथ मंदिराला अर्पण करण्यात आले. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारात त्रिशूळाची विधिवत पूजा करून ते वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात सुपूर्द केले. हे भव्य त्रिशूल मंदिर परिसरात प्रतिष्ठापित करण्यात आल्यानंतर मंदिराच्या धार्मिक आणि वास्तुशोभेत विशेष भर पडणार आहे. त्रिशूळाचे विशाल आकारमान आणि आकर्षक रचना भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील प्रसिद्ध चौरागड मंदिर परिसराशी संबंधित असलेल्या चौरागड पंच कमेटीने महाशिवरात्रीनिमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगांना त्रिशूल अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाचा एक भाग म्हणून वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला हे भव्य त्रिशूल अर्पण करण्यात आले. धार्मिक श्रद्धा, शिवभक्ती आणि ज्योतिर्लिंगांविषयीचा आदर व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत होत असून, अधिक मासात वैद्यनाथाच्या चरणी अर्पण झालेले हे त्रिशूल आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
५५ वर्षांची परंपरा आणि चौरागड पंच कमेटीचा संकल्प
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील प्रसिद्ध चौरागड महादेव यात्रेशी संबंधित असलेल्या या परंपरेला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी लाखो शिवभक्त चौरागड महादेवांच्या दर्शनासाठी जातात आणि तेथे त्रिशूल अर्पण करण्याची परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. त्याच परंपरेचे जतन करत श्री चौरागड पंच कमेटी, श्री बडी माता मंदिर व श्री राम मंदिर, छोटी बाजार यांच्या सहकार्याने गेल्या ५५ वर्षांपासून विविध तीर्थक्षेत्रांना त्रिशूल अर्पण केले जात आहे. २०१३ पासून देशातील बारा ज्योतिर्लिंगांना त्रिशूल अर्पण करण्याचा संकल्प समितीने हाती घेतला आहे.त्याच परंपरेचा भाग म्हणून आता परळी वैजनाथ येथे हे भव्य त्रिशूल अर्पण करण्यात आले आहे.
आतापर्यंत विविध धातूंमधील शेकडो त्रिशूळ भगवान शंकराला अर्पण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे २०१३ पासून देशातील बारा ज्योतिर्लिंगांना त्रिशूल अर्पण करण्याचा संकल्प समितीने हाती घेतला.या उपक्रमांतर्गत २०१३ मध्ये महाकालेश्वर, २०१४ मध्ये ओंकारेश्वर, २०१५ मध्ये त्र्यंबकेश्वर, २०१६ मध्ये सोमनाथ, २०१७ मध्ये नागेश्वर, २०१८ मध्ये केदारनाथ, २०१९ मध्ये रामेश्वरम्, २०२० मध्ये मल्लिकार्जुन, २०२१ मध्ये काशी विश्वनाथ, २०२२ मध्ये बाबा वैद्यनाथ, २०२३ मध्ये घृष्णेश्वर आणि २०२४ मध्ये भीमाशंकर येथे त्रिशूल अर्पण करण्यात आले आहेत.अशोक चौरसिया चौरागढ पंच कमेटी, वरिष्ठ संरक्षक.