Gujarat Flood 
बीड

Gujarat Flood: गुजरातमधील पुरात अडकलेल्या ३५ पर्यटकांमध्ये परळीतील दाम्पत्य; हेलिकॉप्टरद्वारे सुखरूप सुटका

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात औरंगा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे महाराष्ट्रातील सुमारे ३५ पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात औरंगा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे महाराष्ट्रातील सुमारे ३५ पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली. मात्र, गुजरात प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचाव मोहीम राबवत सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. या पर्यटकांमध्ये परळी वैजनाथ येथील रुपेश झंवर आणि त्यांची पत्नी जान्हवी झंवर या दाम्पत्याचाही समावेश होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्यटक खासगी ट्रॅव्हल बसने गुजरातमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीला अचानक पूर आल्याने बसचा मार्ग बंद झाला आणि सर्व पर्यटक अडकून पडले. रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.

घटनेची माहिती मिळताच गुजरात प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्थानिक यंत्रणा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एक-एक करून सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या बचाव मोहिमेत सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, पूरस्थितीमुळे रुपेश आणि जान्हवी झंवर यांच्याशी संपर्क तुटल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळताच परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने तातडीने गुजरातमधील संबंधित प्रशासन, बचाव छावणी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे झंवर दाम्पत्याचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला.

झंवर दाम्पत्य सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला. अडचणीच्या काळात आपल्या मतदारसंघातील नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने दाखविलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT