बीड

Parali News | आकाशात सायंकाळी अचानक दिसली लांबलचक पांढरी रेष; परळीकरांमध्ये कुतूहल, नेमकं काय?

तज्ज्ञांच्या मते जेट विमानामुळे तयार झालेली 'कॉन्ट्रेल'

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : रविवारी सायंकाळी परळी शहराच्या आकाशात अचानक दिसलेल्या लांबलचक पांढऱ्या रेषेमुळे नागरिकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले. अनेकांनी ही रेषा मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. "ही नेमकी कशाची रेष आहे?", "कोणते तरी दुर्मिळ खगोलीय दृश्य आहे का?", अशा चर्चांना उधाण आले.विशेष म्हणजे, आकाशात विमान स्पष्टपणे दिसत नसतानाही ही पांढरी रेष बराच वेळ कायम असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.

तज्ज्ञांच्या मते 'कॉन्ट्रेल'

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अशा प्रकारची पांढरी रेष बहुतेक वेळा उंचावरून जाणाऱ्या जेट विमानामुळे तयार होणारी 'कॉन्ट्रेल' (Condensation Trail) असते. विमानाच्या इंजिनातून बाहेर पडणारी गरम वाफ अतिथंड वातावरणात बर्फाच्या सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित झाल्याने आकाशात अशी रेष तयार होते. वातावरणातील आर्द्रतेनुसार ही रेष काही मिनिटांपासून ते अर्धा तास किंवा त्याहून अधिक काळही दिसू शकते.

मात्र, प्रत्यक्ष विमान न दिसल्याने अनेक नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे हा विषय सोशल मीडियावरही चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, या घटनेबाबत कोणतीही घाबरण्याची किंवा अफवा पसरवण्याची गरज नसल्याचे जाणकारांनी सांगितले असून, नागरिकांनी अशा घटनांकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT