परळी ः शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सरस्वती नदीपात्राचे खोलीकरण करताना त्याठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करू नये, पर्यावरणा बरोबरच जलस्रोताचा संभाव्य धोका टाळावा अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नगराध्यक्ष व नगरपरिषदेला केली आहे. गाव भागातील अनेक नागरिकांनी यासंदर्भात नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडले होते, त्यानंतर याची दखल घेत त्यांनी ही सूचना केली.
अंबेवेस भागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीपात्राचे सौंदर्यीकरण, स्वच्छता व खोलीकरण करण्यासाठी शासनाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नगरपरिषदेला मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. नदीपात्राची सध्याची अवस्था बघता त्याचे रूप पालटणे आवश्यक होते, तथापि नदीपात्राचे खोलीकरण करत असताना बेसमेंटला सिमेंट काँक्रिटीकरण केले जावू नये याची दक्षता पालिका प्रशासनाने घ्यावी.
पावसाळ्यात ज्यावेळी ही नदी वाहते, त्यावेळी पाणी जमिनीत मुरते आणि त्याचा परिणाम म्हणजे गाव भागातील आड अथवा बोअरला पाणी कायम राहते, नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत नाही. तथापि नदीपात्रात सिमेंट काँक्रिटीकरण केल्यास पाणी झिरपणार नाही आणि गाव भागातील आड, बोअर आटतील परिणामी नागरिकांना मोठी अडचण निर्माण होईल, त्यामुळे हे काँक्रिटीकरण करू नये, अशी मागणी अनेक नागरिकांनी ना. पंकजाताईंना प्रत्यक्ष भेटून केली होती.
या मागणीची दखल घेऊन ना. पंकजाताईंनी नदीपात्रात खोलीकरण करताना सिमेंट काँक्रिटीकरण करू नये तसेच पर्यावरणाबरोबरच जलस्रोताचा संभाव्य धोका टाळावा अशी सूचना पालिकेच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, बाजीराव धर्माधिकारी व प्रशासनाला केली आहे.