माजलगाव : भारतीय जनता पक्षाचे माजलगाव विधानसभा प्रमुख माधव निर्मळ यांनी नुकतीच एका नामांकित कंपनीची नवी चारचाकी गाडी खरेदी केली. या नव्या वाहनाची पूजा महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली. मात्र, पूजेदरम्यान पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेल्या एका विधानाने माजलगावच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
गाडीच्या पूजनानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतीकात्मक स्वरूपात वाहनाचे स्टेअरिंग हातात घेतले. त्यावेळी त्या हसत म्हणाल्या, "माधव तात्यांना या गाडीला शोभेल असे पद मला द्यावे लागेल." त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वागत केले. हे विधान केवळ कौतुक म्हणून होते की त्यामागे भविष्यातील राजकीय संकेत दडले आहेत, याची चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे.
माधव निर्मळ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. विशेषतः ते पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विविध पक्षीय कार्यक्रम, संघटनात्मक बैठका आणि जनसंपर्क मोहिमांमध्ये त्यांची सक्रिय भूमिका पाहायला मिळते. त्यामुळे पक्षात त्यांची वाढती ताकद आणि पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर असलेला विश्वास याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे
गाडीच्या पूजनावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतः स्टेअरिंग हातात घेतल्याचे छायाचित्र आणि त्यानंतरचे त्यांचे वक्तव्य सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर माजलगाव विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकीय घडामोडींविषयी विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. पक्षातील काही कार्यकर्त्यांच्या मते, भविष्यात माधव निर्मळ यांच्याकडे पक्ष संघटनेत किंवा एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीची धुरा सोपविली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे