Oil Black Market : बीडमध्ये तेलाचा काळाबाजार; चार आस्थापनांवर धाड file photo
बीड

Oil Black Market : बीडमध्ये तेलाचा काळाबाजार; चार आस्थापनांवर धाड

'रिफाइंड'च्या नावाखाली एकाच तेलाची विक्री; तब्बल १ कोटी ९३ लाख रुपयांचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

Oil black market in Beed; Raid on four establishments

बीड, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यात खाद्यतेलाच्या रिपॅकिंग व साठवणूक आस्थापनांवर धडक कारवाई केली. बीड शहरातील दोन ऑईल रिपॅकिंग युनिट, वडवणी येथील एका आस्थापनेवर तसेच माजलगावातील सुट्टे खाद्यतेल साठवणाऱ्या गोदामावर छापे टाकण्यात आले. या चारही कारवायांमध्ये सुमारे १ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा १ लाख १८ हजार ९४० किलोहून अधिक खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित चारही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करून त्या बंद करण्यात आल्या आहेत.

करण्यात बीड शहरातील एमआयडीसी परिसरातील मेसर्स स्वागत ऑईल इंडस्ट्रीज येथे ६ ऑगस्ट रोजी कारवाई आली. तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलेले टिन पुन्हा वापरत असल्याचे आढळले. विशेष म्हणजे सोयाबीन तेल एकाच टाकीतून पॅक करून त्यावर 'रिफाइंड' आणि 'अल्ट्रा रिफाइंड' असे वेगवेगळे उल्लेख करून विक्री केली जात असल्याचे तपासणीत आढळले. परिसर अस्वच्छ होता.

तेलाच्या तपासणीसाठी इन हाउस प्रयोगशाळा, विश्लेषणाचे रेकॉर्ड तसेच तांत्रिक व्यक्ती उपलब्ध नव्हती. घाऊक तेलाचे विश्लेषण प्रमाणपत्रही तपासणीवेळी सादर करण्यात आले नाही.

या कारवाईत ६६, ६५२.६ किलो खाद्यतेलाचा, एकूण १ कोटी ५ लाख ८५ हजार २३६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. सोयाबीन व पाम तेलासह स्वागत गोल्ड, गुडलुक आणि स्वस्तिक गोल्ड या स्थानिक ब्रँडच्या पॅक तेलाचा समावेश आहे. या साठ्यातून दहा अंमलबजावणी नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

चारही आस्थापना बंद

अन्न सुरक्षा व ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन चारही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले असून संबंधित आस्थापने बंद करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकांनी केली.

चरखा ऑईल मिलमध्ये नियमांचा फज्जा

एमआयडीसीतील मेसर्स चरखा ऑईल मिल येथेही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. येथे वापरलेले टिन मोठ्या प्रमाणावर पुन्हा वापरण्यात येत होते. त्याच टाकीतून पाल्मोलिन तेल पॅक करून 'रिफाइंड' आणि 'अल्ट्रा रिफाइंड' अशा स्वरूपात विकले जात असल्याचे आढळले. टाक्या व पाइपलाइनवर तेलाचे नाव, ओळख टॅग किंवा लेबल नव्हते. टाक्यांची स्वच्छता समाधानकारक नव्हती, तर स्वच्छतेची नोंदही उपलब्ध नव्हती. या ठिकाणी ४५,९९५.७ किलो खाद्यतेलाचा, ७८ लाख २२ हजार ५० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. शुभम, अनुज ड्रॉप, शुभम अल्ट्रा आदी बँडच्या तेलासह खुल्या सोयाबीन, पाल्मोलिन आणि राईस ब्रान तेलाचा साठा त्यात आहे. अकरा नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

माजलगावात सुट्टया तेलाचा साठा पकडला

माजलगावातील जुना मोंढा भागातील मेसर्स जान्हवी कमर्शियल्सच्या गोदामावरही धडक कारवाई करण्यात आली. कोणतीही वैध माहिती, बॅच नंबर अथवा लेबल नसलेले सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल असुरक्षित पद्धतीने साठवून ठेवण्यात आले होते. वापरलेले टिन, अस्वच्छ परिसर, तेलाच्या विश्लेषणाच्या नॉर्दीचा अभाव आणि टाक्यांची अस्वच्छता यासह अनेक त्रुटी आढळल्या. या कारवाईत १,७४६ किलो सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल, २ लाख ७९ हजार ३६० रुपये किमतीचे, जप्त करण्यात आले. त्यातील दोन नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सुट्ट्या तेलाच्या विक्रीला बंदी असल्याने हा साठाही जप्त करण्यात आला

वडवणीत ७.२४ लाखांचे तेल जप्त

वडवणी तालुक्यातील मेसर्स जय हनुमान ट्रेडर्सवर ७ ऑगस्ट रोजी छापा टाकण्यात आला. येथेही वापरलेले टिन, अस्वच्छ परिसर, तेलाच्या तपासणीचे रेकॉर्ड नसणे, तांत्रिक व्यक्तीचा अभाव, घाऊक तेलाचे विश्लेषण प्रमाणपत्र नसणे, तसेच तेल साठवणूक टाक्यांवर ओळख चिन्हांचा अभाव आढळला. या कारवाईत ४,५४५.२ किलो खाद्यतेलाचा ७ लाख २४ हजार ५९६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. त्यात सोहम बँडचे पाल्मोलिन तेल तसेच खुले सोयाबीन व पाल्मोलिन तेलाचा समावेश आहे. तीन नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT