कडा : आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी परिसरात वन्यप्राण्याच्या वावरामुळे निर्माण झालेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. परिसरात वाघ असल्याची चर्चा सुरू असतानाच ट्रॅप कॅमेऱ्यात तब्बल आठ वर्षांचा आणि सुमारे ७० किलो वजनाचा बिबट्या कैद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायीची शिकार केल्यानंतर या बिबट्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले गेल्याने परिसरातील वन्यप्राण्यांच्या हालचालींचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आष्टी तालुक्यातील विविध भागांत वन्यप्राण्यांचा वावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शेतशिवारात पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लोखंडवाडी परिसरात गायीची शिकार झाल्यानंतर वन्यप्राण्याची ओळख पटविण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याने महत्त्वाचा पुरावा समोर आणला आहे
विशेष म्हणजे, वाघाच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने या विशिष्ट घटनेबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. आठ वर्षांचा आणि ७० किलो वजनाचा बिबट्या परिसरात वावरत असल्याची बाब निश्चितच गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
️शेतकरी आणि पशुपालकांनी सावध राहण्याची गरज!
बिबट्याच्या वावरामुळे शेतात जाणारे शेतकरी, पशुपालक आणि शेतशिवारात काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे, रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर जाणे टाळणे आणि वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करता वनविभागाला माहिती देणे गरजेचे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केले आहे. वन्यप्राण्यांचा वावर आणि पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरात योग्य ती निगराणी ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.