Beed News:
नेकनूर : शुक्रवारी मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील खंडाळा पाटीजवळ पलटी झालेल्या मोठ्या ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या आढळल्या. हा तांदूळ व्यापाराचा की इतर मार्गाने चाललेला आहे, याची खात्री करण्यासाठी नेकनूर पोलिसांनी बीड तहसीलच्या पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, पाच दिवस लोटत असतानाही याकडे पाहण्यास पुरवठा विभागाला वेळ नसल्याने, "संबंधितांना वाचवण्यासाठी वेळकाढू धोरण राबवले जात आहे का?" असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोल्हापूरहून चंद्रपूरकडे हा ट्रक व्यापाऱ्याकडे जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे असले तरी, पाटोदा रस्त्यावर तो पलटी झाल्याने संशय बळावला आहे.
शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान पाटोद्याकडून मांजरसुंबाच्या दिशेने निघालेला १२ टायर ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे वळणावर पलटी झाला. ट्रक पलटी झाल्याने बाजूलाच असलेल्या खंडाळा व जाधव वस्ती येथील नागरिक जमा झाले. कोणाला काही दुखापत झाली आहे का, हे पाहत असताना सदर ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या आढळून आल्या. ट्रक अपघातग्रस्त झाल्याने हा तांदूळ इतरत्रही पडला होता. त्यामुळे हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असावा, असा संशय आल्याने काही नागरिकांनी नेकनूर पोलिसांना याची माहिती दिली.
या घटनेनंतर काही वेळानेच दोन अनोळखी वाहने आली. त्यांनी चालकाला गाडीत बसवून पोलीस ठाण्याकडे नेले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास दुसरा एक ट्रक आला. त्याचा क्रमांक MH-४४, U-१९०३ असा होता. त्यामध्ये हा तांदूळ हालवण्यात आला अशी माहिती आहे.
अपघातग्रस्त ट्रकसह यामध्ये असलेला तांदूळ पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारपासून तांदळासह ट्रक नेकनूर पोलीस ठाण्यात असून, त्यातील तांदूळ व्यापाऱ्याचा, रेशनचा की अन्य कुठला, या संदर्भात पाच दिवस लोटत असतानाही पुरवठा विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प असल्याने कारवाई लांबली आहे.
खंडाळा पाटीजवळ ट्रक पलटी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले. मद्यप्राशन केलेला चालक जखमी अवस्थेत असल्याने त्याला उपचारासाठी पाठवण्यात आले. तांदूळ इतरत्र जाऊ नये म्हणून संबंधित ट्रान्सपोर्टने बीडहून दुसरा ट्रक पाठवून तो माल हलवून नेकनूर ठाण्यात आणला. ट्रान्सपोर्टने दाखवलेल्या कागदपत्रांत तो कोल्हापूर येथून चंद्रपूरकडे जात असल्याचे आढळून आले; मात्र त्याची योग्य ती तपासणी व्हावी, यासाठी बीड तहसीलच्या पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. अद्याप तपासणी झाली नसून, तपासणीनंतरच कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे नेकनूरचे सपोनि मंगेश साळवे यांनी सांगितले