CBI Raid Ambajogai NEET Case 
बीड

NEET Paper Leak Case | अंबाजोगाईत CBI ची धाड; लातूर कनेक्शनप्रकरणी २ विद्यार्थ्यांना ताब्यात घेत ३ तास चौकशी

NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाई शहरात आढळल्याने शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे आता मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरात पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी (दि.२१) अंबाजोगाईत थेट धडक कारवाई केली. सीबीआयच्या विशेष पथकाने शहरातील दोन संशयित विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची तब्बल तीन तास कसून चौकशी केली. या कारवाईमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे विशेष तपास पथक गुरुवारी सकाळी अत्यंत गुप्तपणे अंबाजोगाई शहरात दाखल झाले. कारवाईची गोपनीयता राखण्यासाठी पथकाने स्थानिक पोलिसांनाही याची फारशी भनक लागू दिली नाही. सीबीआयने थेट संशयित विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आणि एका अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांची मॅरेथॉन चौकशी केली.

ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित विद्यार्थी मूळचे अंबाजोगाईचे असून ते लातूर येथे राहून 'NEET' परीक्षेची तयारी करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याचा म्होरक्या लातूर येथील मोटेगावकर क्लासेसचा संचालक आणि त्याच्याशी संबंधित इतर १० जणांना सीबीआयने आधीच ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली.

चौकशीदरम्यान सीबीआयने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन, सिमकार्ड आणि मेमरी कार्ड जप्त केले आहेत. या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गैरमार्गाने किंवा आर्थिक देवाणघेवाण करून पेपर मिळवला होता का? याचा तपास सुरू आहे.

लातूर हे महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसचे मुख्य केंद्र असल्याने, या प्रकरणाचे धागेदोरे लातूरमधील मोठ्या रॅकेटशी थेट जोडले गेले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलमधील चॅट्स, कॉल्स आणि फॉरेन्सिक डेटावरून येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT