अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील पुरातन विहिरीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता खासदार बजरंग सोनवणे यांच्या थेट इशाऱ्याने नवे बळ मिळाले आहे. लोक जनशक्ती पार्टीच्या (LJP) वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी भेट देत, सोनवणे यांनी नगर परिषद प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. "येत्या चार दिवसांत विहिरीवरील अतिक्रमण हटवले नाही, तर मला स्वतःला या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषणाला बसावे लागेल," असा सज्जड दम त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
शहरातील महाराष्ट्र बँकेसमोरील एका पुरातन विहिरीवर अवैधरित्या अतिक्रमण करून ती बुजवण्यात आली आहे. या जागेवर नगर परिषदेने दुकानांसाठी बांधकाम परवाना दिल्याने वाद निर्माण झाला आहे. याविरोधात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा तक्रारी आणि निवेदने देण्यात आली. प्रशासनाने निधी नसल्याचे कारण दिल्यानंतर, आंदोलकांनी 'भीक मागो' आंदोलन करून जमा झालेली रक्कमही नगर परिषदेला दिली होती. तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने LJP चे जिल्हाध्यक्ष अशोक काळे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
विहीर बुजवणाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
अनधिकृत बांधकाम परवाना देणाऱ्या मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
विहिरीवरील दुकाने हटवून ती पुनर्जीवित करावी.
शनिवारी, उपोषणाच्या पाचव्या दिवशी खासदार सोनवणे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. त्यांनी थेट मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रशासनाला धारेवर धरले. खासदार सोनवणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता नगर परिषद प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, अमर देशमुख, राजेश वाहुळे यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते.