परळी वैजनाथ : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा अमृत रेल्वे स्थानक या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत 43 कोटी रुपयांच्या निधीतून रेल्वे स्थानक उभारणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 17 कोटी रुपयांच्या खर्चातून रेल्वे स्थानकातील बांधकामे सुरू आहेत. परळी वैजनाथ येथील अमृत रेल्वे स्थानक उच्च दर्जाचे व अत्याधुनिक पद्धतीने उभारले जाईल. यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक आर गोपालकृष्णन यांनी आज दिली.
परळी वैजनाथ रेल्वे स्थानक येथे सुरू असलेल्या रेल्वे स्थानकाच्या उभारणीचे, रेल्वे मार्गाचे, परळी– परभणी–नांदेड या दुहेरी मार्गाच्या कामाचे तसेच अन्य तांत्रिक व बांधकाम विषयक कामांचा आढावा घेण्यासाठी आर गोपालकृष्णन हे परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर आले होते. रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता व रेल्वे स्थानकांची सुरक्षितता या दृष्टिकोनातून आपण पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या मुख्य प्रवाहात आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानक येणार आहे.
अमृत रेल्वे स्थानक म्हणून परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आलेला असून 43 कोटी रुपये खर्चातून एक अत्याधुनिक व उच्च दर्जाचे रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे. येत्या एक ते दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. तसेच परळी–बीड–नगर रेल्वे मार्गाचे कामही जलद गतीने सुरू आहे. वंदे भारत रेल्वे परळीतून सुरू करण्याच्या मागणीबाबत वरिष्ठ स्तरावर आपण नागरिकांच्या भावना कळवू अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आर गोपाल कृष्णन यांनी दिली. यावेळी परळी रेल्वे विकास समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही त्यांना देण्यात आले. परळी रेल्वे विकास समितीच्या वतीने जी.एस. सौंदळे, चेतन सौंदळे, कैलास तांदळे, विष्णू मुंडे, माऊली आघाव आदीसह सदस्य, परळीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.