Beed News
पोखरापूर येथील आंदोलनस्थळी खा. प्रणिती शिंदे Pudhari Photo
बीड

पोखरापूर | अप्पर तहसील कार्यालय प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून दिशाभुल : खा. प्रणिती शिंदे

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा

अनगरच्या अप्पर तहसिल कार्यालय रद्दच्या मागणीसाठी मोहोळचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी थांबवितो असे सांगितले होते. हे लोकांना दिशाभूल करणारे असावे. जोपर्यंत जीआर रद्द होत नाही, तोपर्यंत प्रक्रिया थांबणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शंभर टक्के समितीची दिशाभूल केली आहे. जी.आर. रद्दच झाला नाही. असे सांगत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ते अप्पर तहसील कार्यालय कुरुल,कामती किंवा मोहोळ सोडून इतर कुठल्याही भागात होऊ देणार नाही. मला सर्वसामान्यांनी मतदान दिले आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लढते. त्यांचा विश्वास सार्थ करीन असेही खा. शिंदे म्हणाल्या. मोहोळ तहसील कार्यालयाच्या समोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची खासदार प्रणिती शिंदे मोहोळ येथे आल्या होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या, अप्पर तहसील कार्यालय कामती, कुरुल भागात व्हावे अशी माझी भूमिका आहे. जे लोकांना सोयीस्कर पडते, त्या ठिकाणी होणे आवश्यक आहे, कुठेतरी टोकाला जर होत असेल तर त्याचा मी ठामपणे विरोध करते. जोपर्यंत जीआर रद्द नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही. फोनवर तुम्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी कितीही बोलला, पण तुम्ही करत नाही. तुमची आतमधून मिलीभगत आहे. लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे. ते लोक महायुतीच्या माध्यमातून राजकारण करत आहेत, आणि लोकांना वेटीस धरण्यात येत आहे. तर मी सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून हे खपवून घेणार नाही. मी सर्वसामान्यांसाठी लढेन याच्यामध्ये राजकारण करू नका असेही त्या शेवटी म्हणाल्या.

यावेळी शिवसेना नेते दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सीमाताई पाटील, दादासाहेब पवार,बाळासाहेब वाघमोडे, दिनेश घागरे, अशोक भोसले,राजाभाऊ रसाळ, विजय गायकवाड, संतोष महाळनुर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे सदस्य, शहरातील नागरिक उपस्थित होते.

मेलो तरी मागे हटणार नाही

आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे आंदोलकांनी जोपर्यंत ते कार्यालय रद्द होण्याचा आदेश येत नाही. तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका मांडत आमच्यातील कोण मेले तरी चालेल, पण आम्ही या आमरण उपोषणावर ठाम आहोत, तुम्ही तुमच्या पदाची ताकत वापरून आमची मागणी प्रशासनांपर्यंत तीव्रतेने मांडावी अशी मागणी केली.

SCROLL FOR NEXT