अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस 5 वर्षे सश्रम कारावास pudhariphoto
बीड

Beed Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस 5 वर्षे सश्रम कारावास

बीड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पुढारी वृत्तसेवा

बीड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इस्लामपुरा येथील आरोपी शेख युनुस शेख लाल यास न्यायालयाने दोषी ठरवत 5 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश-1 सुरेश एस. घोरपडे यांनी दिला.

या प्रकरणातील घटना 19 मार्च 2023 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली होती. पीडित मुलगी दूध आणण्यासाठी परिसरातील एका चहाच्या हॉटेलजवळ गेली असताना, आरोपीने तिला हॉटेलमध्ये बोलावले. मुलीने हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला असता, आरोपीने जबरदस्तीने तिचा हात धरून तिला आत ओढले आणि अश्लील वर्तन करून विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने एक व्यक्ती मदतीला धावून आली, त्यामुळे आरोपीचा पुढील प्रयत्न फसला आणि मुलगी सुरक्षित घरी पोहोचली.

पोलीस तपास आणि कारवाई

या घटनेनंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354 (अ) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपास अधिकारी जी. एल. अंतरप यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

पीडितेची साक्ष ठरली महत्त्वाची

प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे, फिर्यादी आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले असतानाही, पीडितेची ठाम साक्ष, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी तसेच सरकारी वकील अजय श्रीमंतराव तांदळे यांचा प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला 5 वर्षे कारावासाची कठोर शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT