माजलगाव : शहरातील एका नामांकित महाविद्यालयासमोर असलेल्या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून अरमान रहीम शेख या तरुणाविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील १६ वर्षीय मुलगी शहरातील एका महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेते. तिच्या वर्गातील मैत्रीण आयशा हिने प्रॅक्टिकल बुक नेण्यासाठी या मुलीला फोन करून बोलावले होते.
मंगळवारी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास पीडित मुलगी प्रॅक्टिकल बुक देण्यासाठी महाविद्यालयासमोर असलेल्या 'बेकर्स लॉन्स कॅफे' येथे पोहोचली. मात्र, तिथे तिची मैत्रीण हजर नव्हती. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या अरमान रहीम शेख याने "तुझी मैत्रीण बाहेर गेली आहे, तोपर्यंत माझ्याकडे बस," असे म्हणत मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने स्वतःजवळ बसवले आणि गैरवर्तन केले.
पीडित मुलगी प्रतिकार करत असतानाच कॅफेमधील इतर काही मुले तिथे आली. त्यांनी अरमानच्या तावडीतून मुलीची सुटका केली. घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन पालकांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या घटनेची माहिती मिळताच काही हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला धीर देत कायदेशीर प्रक्रियेत मदत केली. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
माजलगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पिंक पथकाचे प्रमुख महेश भोसले हे करत आहेत. या घटनेमुळे महाविद्यालयीन परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.