केज : आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती, ती परत आलीच नाही. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केल्याचा संशय कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक अल्पवयीन मुलगी रविवारी (दि.८) काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती, ती परत आलीच नाही. यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केले असावे, असा संशय तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. आई-वडिलांनी परिसरासह तिच्या मैत्रिणींकडे व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.