केज (जि. बीड) : महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी ही कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली. पण, ती कॉलेजला जाण्याऐवजी तिच्या आत्याच्या मुलाने (दाजी) पळवून नेले. सदर अल्पवयीन मुलीने ती तिच्या दाजी सोबत जात असल्याची चिठ्ठी घरी ठेवली. यानंतर तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिचे अज्ञात कारणासाठी अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज शहरात एका लहान खेड्यात नियमित कॉलेजला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनी वाटेतील बस थांब्यावर आणून सोडले. त्यानंतर वेळ टळून गेली तरी मुलगी घरी न आल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. म्हणून घरच्या लोकांनी तिचे सामानाची झडती घेतली असता तिच्या पर्समध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यात तिने त्यांच्या गावाशेजारी असलेल्या आत्याच्या मुलासोबत गेली असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून गु. र. नं. १३०/२०२५ भा. न्या. सं. १३७ नुसार तिच्या आत्याच्या मुलानेच अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे करीत आहेत.
सदर अल्पवयीन मुलीने आई-वडिलांना उद्देशून वहीच्या पानावर लिहिलेल्या चिठ्ठीत असे लिहिले आहे की, "पप्पा मला माफ करा आपली गरिबी आहे. म्हणून मी बबलु दाजी सोबत जात आहे."