Kej migrant worker death
केज : केज तालुक्यातीलकानडी माळी येथे खडी क्रशरवर काम करणाऱ्या झारखंड राज्यातील २५ वर्षीय परप्रांतीय मजुराचा खडी व दगडाची वाहतूक करणाऱ्या हायवाने खदाणीच्या भिंतीलगत चिरडल्याने मृत्यू झाला. मोहम्मद साहिल प्रवाज (वय २५, रा. झारखंड) असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मोहम्मद साहिल प्रवाज हा खदाणीच्या भिंती लगत उभा होता. त्या वेळी खडी व दगडाची वाहतूक करणाऱ्या हायवा (एम एच-२०/इ जी- ४०१२) चालक बाजीराव बापुराव फुंदे (रा. जिवाचीवाडी ता. केज) याने हायवा निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवल्यामुळे मोहम्मद हा खदानीचे कडेला दबल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गुरूवारी (दि. ४) मृत तरुणाचे वडील सखावत हुसैन इस्माईलमियाँ यांच्या फिर्यादी वरून हायवा चालक बाजीराव बापुराव फुंदे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे पुढील तपास करीत आहेत.