Mawa ban 
बीड

Mawa ban decision| सार्वजनिक आरोग्यासाठी मावाबंदीचा निर्णय स्वागतार्ह; पोलिस प्रशासनाचे नागरिकांकडून स्वागत

पुढारी वृत्तसेवा

कडा

राजू म्हस्के: गेल्या काही दिवसांपासून ‘मावा उर्फ खर्या’ या शब्दाभोवती सारा आष्टी तालुका फिरत असून मावा हा अस्सल बंदी घातलेला गुटखा नसला तरी नशेच्या वाटेवरचा तो टप्पा आहे. मात्र अशा नशेच्या आहारी जाणाऱ्या, अनेक आयुष्य, संसार उद्ध्वस्त करणाऱ्या तसेच पिढ्यानपिढ्या बरबाद करणाऱ्या आणि नव्या पिढीला गिळंकृत करणाऱ्या व्यसनाधीनतेकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही ही खंत आहे.

व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करत असलेल्या अनेकांना हे भीषण चित्र रोज दिसत आहे. याचा परिणाम फक्त व्यसन करणाऱ्यालाच नाही, तर अप्रत्यक्षपणे त्याच्या कुटुंबाला होते, ही वस्तुस्थिती आहे. सध्या सुगंधी तंबाखू व गुटख्याबरोबर माव्याचे व्यसनही फार बोकाळले आहे. गुटखाबंदीनंतर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी जोरात सुरू असलेल्या मावाविक्रीला आता पायबंद बसला असून अन्न व औषध प्रशासनानी माव्यावर बंदी घातली असताना सर्यासपणे मावा विकला जात होता. त्यामुळे आता मावा विकणार्‍या टपरी चालकांवर कारवाई होत असल्याने नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. शासनाने गुटखाबंदी केल्यानंतरही शहरात गुटखा विक्री पूर्ण थांबली नसली, तरी गुटखा खाणारा मोठा वर्ग माव्याकडे वळला होता.

तालुक्यात शहरात सुमारे तीनशे ते चारशे टपर्‍यांवर माव्याची विक्री होते. हजारो किलो सुपारीपासून बनवलेला मावा एका दिवसात विकला जातो. मावाविक्रीतून दररोज लाखोंची उलाढाल होते. प्रमुख रस्त्यांप्रमाणेच गल्लीबोळातही मावा विकणार्‍या टपर्‍यांचे पेव फुटले आहे.टपरीवर येणारा नव्वद टक्के ग्राहक फक्त मावा घेण्यासाठी येतो. मावा खाणार्‍यांमध्ये कामगार वर्गापासून सरकारी अधिकार्‍यांचा समावेश आहे. शहरात तयार होणारा मावा ग्रामीण भागात पोहोचवण्याची व्यवस्थाही काही टपरीचालकांनी केली आहे.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही मावा खाणार्‍यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पहाटेपासून सुरू झालेला हा व्यवसाय रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. काही टपर्‍यांवर माव्यासाठी वापरली जाणारी सुपारी व तंबाखू हलक्या प्रतीची असल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होतो. रस्त्यावर वाहन चालवताना मावा खाऊन थुंकणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. पाठीमागच्या वाहन चालकांना याचा त्रास होतो, याचे भानही बाळगले जात नाही.यातून अनेकदा रस्त्यावरच वाद होतात. रस्ते,सरकारी व खासगी कार्यालयाच्या भिंती,कोपरे, तसेच खिडक्यांच्या बाहेरची जागा मावा खाऊन थुंकणार्‍यांमुळे व्यापलेली आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य नगरकरांकडून स्वागत होत आहे.

त्यांच्यावर गुन्हे दाखल करू... माव्यासह सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश आहेत.शनिवार पासून तालुक्यात कडक कारवाई सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. मावा विक्रेत्यांवर जप्तींची कारवाई करून कड्यात एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशीच कारवाई मावा व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर करून गुन्हे दाखल करण्यात येतील.’’
- शरद भुतेकर,पोलिस निरीक्षक आष्टी
यापुढे शहर व परिसर स्वच्छ राहण्यास मदत.. मावा तसेच तंबाखुयुक्त पान खाऊन शहरात कुठेही पिचकाऱ्या मारणाऱ्याची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे.शाळा,महाविद्यालये, विशेषतः विविध शासकीय कार्यालये याची उदाहरणे आहेत.या निर्णयाने याला चाप बसेल.शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरू शकेल. मात्र,त्यासाठी अंमलबजावणी काटेकोर व्हावी.’’
- प्रा.जमीर सय्यद, क्रीडा मार्गदर्शक

शाळेच्या आवारात, परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा कायदा २००३ लागू झाला असूनही शाळा कॉलेज परिसरात गुटखा, मावा आणि तंबाखूजन्य पदार्थ सहज मिळतात.याचा परिणाम शालेय मुलांवर होताना दिसतो अनेक शाळांच्या परिसरात गुटख्याच्या पाकिटांचा मोठ्या प्रमाणात कचरा दिसत असतो.याशिवाय बेकायदा दारू आणि गुटखा थांबवण्यास शासनाचे नाकर्तेपणा दिसून येते. अवैध दारू विरोधी समित्या तालुका निहाय स्थापन्याचे परिपत्रक गृहखात्याने २००४ मध्ये काढले होते, पण अद्याप कुठेही अशा समित्या स्थापन झालेल्या दिसत नाहीत.

कडक अंमलबजावणी आवश्यक... शासनाने घेतलेला निर्णय तरुण पिढीसाठी वरदान ठरणार आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शासनाचे अभिनंदन करावयास हवे. प्रामुख्याने तरुण पिढीला माव्याच्या व्यसनाने वेढले आहे. यातून त्यांच्या वैयक्तिक स्वास्थ्याबरोबरच सामाजिक व सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येत होते.या निर्णयाची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.’’
- प्राध्यापक अशोक कोरडे,गांधी महाविद्यालय,कडा
तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी हवी... माव्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो.त्यामुळे पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. माव्याबरोबरच सर्व तंबाखूजन्य पदार्थ व अल्कोहोलवर बंदी घालण्याची आवश्यकता आहे.सर्वच बाबी कायद्याने थांबवता येणे शक्य नसते. त्यामुळे शासनाने तंबाखूजन्य पदार्थ व मावाच्या दुष्परिणामांबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करणे आवश्यक आहे.’’
-डॉ.महेश नाथ,दंतरोग तज्ज्ञ कडा
वाईट सवय बंद होईल अल्पवयीन मुलांमध्ये मावा खाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.मावा खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते, याची जाणीव या मुलांना नसते.पोलीस प्रशासनाने हा चांगला निर्णय घेतला असून किमान अल्पवयीन मुलांमधील वाईट सवयी पासून सुटका होण्यास यातून मदत मिळेल.
- अभिजित सोनवणे, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT