केज : संतोष देशमुख यांच्या हत्येला ३५ दिवस उलटून गेले आहेत. तरी यातील मुख्य गुन्हेगार म्हणून चर्चेत असलेला मास्टरमाइंड वाल्मीक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्याचबरोबर त्याच्यावर मोक्का अंतर्गत देखील कारवाई झालेली नाही. त्यालाही या गुन्ह्यात अटक करून त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी, असे म्हणत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर सोमवारी (दि.१३) चढून आंदोलन केले.
यावेळी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले आढळून आले. जोपर्यंत वाल्मीक कराड याच्यावर हत्या आणि मोक्कांतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, असे म्हणत त्यांनी जीवन संपविण्याचा इशारा प्रशासनाला दिला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फोन वरून त्यांच्याशी संपर्क साधला आणि तुमचा जीव हा देशमुख कुटुंबियांसाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही जिवंत राहिलात, तरच खऱ्या अर्थाने संतोष देशमुख यांना न्याय मिळेल. अशी विनवणी केल्याने अखेर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले.
याबाबतची माहिती अशी, आवादा एनर्जी या पवन चक्कीच्या प्रकल्पाच्या संबंधित दोन कोटीची खंडणी मागण्याचा प्रकार वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडानी केला होता.आणि याच प्रकरणामुळे संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे, असा आरोप सतोष देशमुख यांच्या कुटुंबियाने केला आहे. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व खूनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबाने केली होती. मात्र अजूनही त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई का केली नाही म्हणत धनंजय देशमुख यांनी सोमवारी (दि.१३) टॉवरवर चढून जीवन संपविण्याचा इशारा प्रशासनाला दिलेला होता.
दरम्यान आज (सोमवारी) ते मंदिरासमोरील मंडपात बसलेले असताना अचानक ते पोलीस आणि गावकऱ्यांना चकवा देत अचानक गायब झाले. त्यानंतर गावकरी आणि पोलिसांची प्रचंड धावाधाव आणि शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर ते गावातील शाळेजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर गेले असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर गावकऱ्यांसह पोलिस प्रशासनाने पाण्याच्या टाकीकडे धावाधाव केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याची विनंती पोलीस करीत असताना ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी गावकरी आणि महिला प्रचंड आक्रमक झालेले होते. त्यांनी पोलीस हे गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करीत असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत. त्यामुळेच वाल्मीक कराड याच्यावर अद्यापही खून आणि मोक्का अंतर्गत कार्यवाही होतं नसल्याची भावना व्यक्त केली. तसेच महिलांनी आपल्या हातातील बांगड्या काढून पोलिसांचा निषेध म्हणून पोलिसांच्या दिशेने भिरकावल्या. टाकीवर चढलेल्या आंदोलकांनी पोलीसवर येऊ नये, म्हणून टाकीला लावलेली लोखंडी शिडी देखील काढून घेतली.
त्यानंतर थोड्या वेळाने मराठा योद्धा मनोज जरांगे हे आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यांनी मोबाईलद्वारे संवाद साधत धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती केली. यावेळी त्यांच्याशी केलेल्या विनंतीला यश आले. धनंजय देशमुख हे खाली उतरले. आंदोलनापूर्वी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि खासदार बजरंग सोनवणे हे देखील मस्साजोग मध्ये आले होते. त्यांनीही देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
संतोष देशमुख तपास यासंदर्भात देशमुख कुटुंबीयांना पोलीस काहीच माहिती देत नसून ते गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक काय करीत आहेत? ते जर गुंडांना संरक्षण देत असतील तर या प्रकरणात तपास कसा होणार ? या संदर्भात मी सर्व माहिती व पुरावे पत्रकार परिषदेत देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा आणि यातील सर्व गुन्हेगारांना कठोर शासन करायला पाहिजे. तसेच आरोपींना मदत करणाऱ्यावर सर्वावर म्हणजे डॉ. वायबसे यांच्यासह इतरांवर कारवाई करून त्यांनाही अटक का केली जात नाही? त्यांना फरार आरोपी कृष्णा घुले आणि आरोपींना मदत करणारे यांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
वाल्मीक कराड हा मास्टर माईंड संतोष संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंधित आहे. पवन चक्कीच्या खंडणी प्रकरणातूनच त्याच्या गुंडांनी संतोष देशमुख यांची हत्या केली असल्याने त्याच्यावर अद्यापही गुन्हा दाखल का केला जात नाही? त्याच्यावर हत्या आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करा.
पोलीस म्हणतात, विष्णू चाटे याचा मोबाईल सापडत नाही. परंतु पोलिसांनी त्याला फरार व्हायला मदत केलेली आहे. घटनेनंतर सुध्दा त्याचा मोबाईल सुरू होता. मी स्वतः त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात कुणाच्या तरी आदेशावरून पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असतील तर मग मी तरी जगून काय करू? असे म्हणत धनंजय देशमुख यांनी पोलिसांना जीवन संपविण्याचा इशारा दिला होता. जर आरोपी सुटले तर माझ्या भावाला जसे हालहाल करून मारले. तसे मला आणि माझ्या कुटुंबाला ते संपतील. अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.