कडा : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. अशाच प्रकारची एक हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.
सासरच्या मंडळींकडून पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं जीवन संपवले. नवीन घर बांधण्यासाठी पैसे घेऊन ये, तू आणि तुझा नवरा वेगळे घर बांधून राहा, तसेच सामाईक शेतातील घास कापण्याच्या कारणावरून सतत शिवीगाळ अशाप्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास सहन करत राहिलेल्या विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन करत जीवन संपविल्याची घटना अंभोरा येथे घडली. प्रियंका बापू खाकाळ (वय ३०) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
सासरचांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वर्षापूर्वी दीर ज्ञानेश्वर याचा विवाह झाल्यानंतर प्रियंकाचा पैशासाठी छळ सुरू झाला. याला कंटाळूनच प्रियंकाने १३ जून रोजी विषारी द्रव प्राशन केले. उपचारासाठी तिला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते; परंतु बुधवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .मृत विवाहितेचे वडील जालिंदर मारुती वामन यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी अंभोरा पोलिस ठाण्यात सासरा धर्मा विठोबा खाकाळ, सासू सुशीला धर्मा खाकाळ, दीर ज्ञानेश्वर धर्मा खाकाळ, जाऊ सविता ज्ञानेश्वर खाकाळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.