Maratha Reservation : मुंबईतील आंदोलकांसाठी बीडमधून शिदोरी File Photo
बीड

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलकांसाठी बीडमधून शिदोरी

भाकरी, ठेचा, लोणचे घेऊन गावागावांतून गाड्या खाना

पुढारी वृत्तसेवा

Maratha Reservation Meals from Beed for protesters in Mumbai

बीड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आंदोलकांच्या जेवणाची गैरसोय होऊ लागल्याने बीड जिल्ह्यातील गावागावातून हजारो भाकरी, ठेचा, लोणचं व इतर खाद्य पदार्थ मुंबईकडे रवाना केले जात आहेत.

बीड जिल्ह्यातून हजारो युवक मराठा आरक्षण प्रश्नावर मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आरक्षण लढ्यात प्रारंभापासून बीडची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. आता २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन सुरु करण्यात आले असून त्या परिसरातील खाद्यपदार्थाचे हॉटेल्स बंद असल्याने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर आता गावागावातील मराठा समाज बांधवांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

शनिवारी आणि रविवारी दोन दिवसात बीड जिल्ह्याच्या अनेक गावांमधून हजारो भाकरी, लोणचं, ठेसा यासह विविध खाद्यपदार्थ मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत. याकरिता महिलांनी पुढाकार घेतला असून गावात दवंडी दिल्यानंतर घराघरात भाकरी केल्या जातात. त्याबरोबरच चटणी, ठेसा आणि इतर खाद्यपदार्थ गावात एकत्र केले जातात. दहा-वीस गावामधून असे खाद्यपदार्थ एकत्र केल्यानंतर पीकअप अथवा मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे पाठवले जात आहे. थेट आंदोलनात सहभागी नसलेले, गावाकडे थांबलेले मराठा बांधव याकरिता प्रयत्न करतांना दिसत आहेत.

तसेच आणखी कितीही दिवस थांबावे लागले तरी काळजी करु नका, आम्ही बीडमधून शिदोरी पोहच करु अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. गावागावात दवंडी देवून भाकरी तयार करण्याचे आवाहन केले जात आहे. यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असून घरोघरी भाकरी करण्याचे काम महिला करत आहेत. याबरोबरच चटणी, ठेसा व इतर काही दिवस टिकू शकतील अशा पदार्थांची शिदोरी एकत्र केली जात आहे. गावाकडे थांबलेल्या मराठा बांधवांच्या या तत्परतेमुळे मुंबईतील आंदोलकांना मोठा आधार मिळू लागला आहे.

मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथून उपोषण स्थळी एक टेम्पो भाकरी, चटणी, लोणचे, तेल, पापड आदींची शिदोरी रात्रीतून मुंबईला पोहोच करण्यात आली आहे. यामुळे तळणेवाडीकराचे आभार व्यक्त केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT