Beed Soybean Crop pudhari photo
बीड

Beed Soybean Crop : सोयाबीनचे पीक ९० दिवसांचे; ६४ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा

माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव परिसरातील चित्र; उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

किट्टी आडगाव : माजलगाव तालुक्यासह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. सुरुवातीच्या पावसामुळे उगवण चांगली झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाची आशा होती. मात्र, सध्या पीक सुमारे ९० दिवसांचे झाले असून मागील ६४ दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या निर्णायक अवस्थेत आहे. या काळात जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक असते. मात्र, पावसाचा खंड वाढल्याने अनेक शेतांतील ओलावा कमी झाला असून काही ठिकाणी पिकाची पाने पिवळी पडू लागली आहेत. पाऊस आणखी लांबल्यास शेंगा पूर्ण न भरणे, दाण्यांचा आकार कमी होणे आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

बियाणे, खते, औषध फवारणी, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च झाल्याने यंदा चांगले उत्पादन मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, ऐन उत्पादनाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड आणि बदलत्या वातावरणामुळे सोयाबीनवर किडी-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

सोयाबीन अंतिम टप्प्यात आले आहे. ६४ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील ओलावा संपत चालला आहे. आता चांगला पाऊस झाला तर पीक वाचण्याची आशा आहे; अन्यथा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे, अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पंचनामे करण्याची मागणी

पावसाअभावी सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर परिणाम होत असल्याने महसूल व कृषी विभागाने शेतपिकांची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT