माजलगाव : स्कुटीला चारचाकी वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून १७ वर्षीय मुलास मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिली, तसेच सात वेळेस नाक घासायला लावल्याची घटना माजलगाव तालुक्यातील हिवरा (बु.) परिसरात घडली. याप्रकरणी सिद्धांत सिताराम अवघडे (वय १७) याने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, चार जणांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.
दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता सिद्धांत अवघडे हा त्याचा चुलतभाऊ शहादेव भिवाजी अवघडे याच्यासोबत माजलगाव येथून हिवरा येथे जात होता. यावेळी सावरगावच्या अलीकडे पेट्रोलपंपाजवळ दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कुटीला कट मारल्याने दोघे खाली पडले. त्यानंतर त्यांनी स्कुटी उचलून रस्त्याच्या बाजूला घेतली.
तक्रारीत म्हटले आहे की, यानंतर चारचाकी वाहनातील व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन कट का मारला, अशी विचारणा केली. त्यावरून वाद वाढला. यावेळी अभिमन्यू जगताप याने शहादेव अवघडे यास शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. सिद्धांतने त्याला शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यानंतर अभिमन्यू जगताप याने त्याच्याशी वाद घालत चापटाने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर अभिमन्यू जगताप याने इतर साथीदारांना बोलावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बब्बू जगताप, अजय नाईकनवरे आणि अविनाश जोगडे यांनीही मारहाण करून मुक्कामार दिल्याचा आरोप सिद्धांतने केला आहे. तसेच वाहनात बसवून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ वाहनातील व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रीत केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीनंतर सिद्धांत व त्याचा चुलतभाऊ गावाकडे गेले. त्यानंतर या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. सिद्धांत अवघडे याने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अभिमन्यू जगताप, बब्बू जगताप, अजय नाईकनवरे आणि अविनाश जोगडे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.