रस्ता नसल्याने शेतकऱ्याचा ऊस अडकला pudhari photo
बीड

Beed News : रस्ता नसल्याने शेतकऱ्याचा ऊस अडकला

रस्ता बंद, ऊस शेतातच; गाळप संपण्याआधी मदतीसाठी हाक

पुढारी वृत्तसेवा

किट्टी आडगाव: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका हा शेतीच्या बाबतीत सधन तालुका म्हणून ओळखला जातो. विशेषतः ऊस उत्पादनासाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यात तीन मोठे साखर कारखाने तसेच दोन गूळ उत्पादन युनिट्स असल्याने बहुतांश शेतकरी इतर पिकांपेक्षा ऊस पिकावरच भर देतात. मात्र या ऊस शेतीसमोर काही ठिकाणी मूलभूत अडचणींचे सावट उभे राहिले असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे.

माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील शेतकरी भागवत सटवाजी गरड यांची व्यथा याचे जिवंत उदाहरण ठरत आहे. गरड यांच्या नावावर गट नंबर 447 मध्ये सुमारे तीन एकर शेती असून त्या शेतात त्यांनी मोठ्या आशेने ऊस लागवड केली आहे. परंतु या शेतात जाण्यासाठी असलेला पारंपरिक रस्ता सध्या पूर्णपणे बंद झाल्याने त्यांचा ऊस अक्षरशः शेतातच अडकून पडला आहे.

जमिनीच्या नकाशानुसार प्रत्येक शेताला जाण्यासाठी साधारणतः 15 ते 20 फूट रुंदीचा रस्ता असणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे रस्ते अस्तित्वात नसल्याची परिस्थिती आहे. गरड यांच्या शेतात जाण्यासाठी गट नंबर 446 आणि 447 च्या बांधावरून सुमारे 8.25 फूट रुंदीचा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता होता. मात्र तोच रस्ता सध्या बंद झाल्याने वाहन तर दूरच, साधा ऊस वाहून नेणेही अशक्य झाले आहे.यामुळे शेतात उभा असलेला ऊस साखर कारखान्याला किंवा गूळ युनिटकडे पाठवता येत नाही.

सध्या ऊस गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना ही अडचण अधिकच गंभीर ठरली आहे. जर कारखाने बंद झाले तर संपूर्ण ऊस शेतातच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी म्हणून भागवत गरड यांनी प्रशासनाचे अनेक दरवाजे ठोठावले आहेत. महसूल प्रशासनाकडे निवेदन देऊन माझ्या शेताचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र आतापर्यंत या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.

शेतात उभ्या असलेल्या उसामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त करत गरड म्हणाले की, रस्ता नसल्यामुळे माझा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जर गाळप हंगाम संपण्यापूर्वी ऊस नेला गेला नाही तर माझे लाखो रुपयांचे नुकसान होईल. प्रशासनाने तातडीने रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा झालेल्या नुकसानाची जबाबदारी शासनाने घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT