नेकनूर : आमची एखादी भगिनी व्यासपीठावर येऊन रडत असेल, तर आम्ही षंढ झालोत का? सहिष्णुता फक्त आमचीच का? नम्रता आमच्याकडेच पाहिजे का? सर्वधर्म समभाव आम्हीच पाळायचा का ? आम्ही छत्रपती शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या विचाराने चालतो पण ज्यांना येथील संविधान मान्य नाही. घटना, कायदे मानत नाहीत, त्यांना येथे राहण्याचा अधिकार नाही. येथून पुढे आम्ही अन्याय केल्यास उठाव करून काही ठेवणार नाही असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी नेकनूरमध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावर दिला. यावेळी आ. संग्राम जगताप, मठाधिपती लक्ष्मण मेंगडे महाराज, भारत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड तालुक्यातील नेकनूर येथे सोमवारी दुपारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला होते. आ. महेश लांडगे आणि संग्राम जगताप नेकनूरमध्ये दाखल झाल्यानंतर श्रीराम मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा बंकटस्वामी कमानीकडील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याकडे पोहचला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत प्रशासनाला निवेदन देऊन सभास्थळी सर्वजण दाखल झाले .यावेळी तरुणाची गर्दी लक्षवेधी होती.
यावेळी बीड जिल्ह्यात घडलेल्या तीन घटनांच्या कुटुंबातील सदस्य व्यासपीठावर आपबिती सांगताना गहिवरले. देश संरक्षणाचे काम करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचे बीडमध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल सांगताना अश्रू अनावर झाले. सहा वर्षांच्या मुलीला शेजाऱ्याच्या मुलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे सांगताना पोलिस स्टेशनमध्ये धमकी दिल्याचे सांगितले. नेकनूरमधील रिक्षाचालकाने त्याच्यासह कुटुंबातील महिलेला झालेली मारहाण सांगताना अन्यायाचा पाढा वाचला.
या सर्व गोष्टीवर आ. महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात उल्लेख करताना आमची एक भगिनी एवढ्या जनसमुदायासमोर रडत असताना आम्हीच सहिष्णुता,नम्रता, सर्वधर्मसमभाव पाळायचा का? कायदा, शांतता राखायचा ठेका काय फक्त हिंदूंनीच घेतला काय. या शब्दात त्यांनी पोलिस प्रशासनाचेही कान टोचले. तसेच कायद्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला नाही, तर पुढे होणाऱ्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार असाल असा इशारा देत त्यांनी यावेळी दिला.
आम्ही सहिष्णू आहोत पण षंढ नाहीत, आमच्या एका हातात ढाल आहे तर दुसऱ्या हातात भाला आहे. आमच्या माता बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर हजारोने जाऊन धडा द्या, गप्प बसू नका. अन्याय झाल्यानंतर हिंदू म्हणून एक व्हा. घटना दुसऱ्याची असली तरी ती माझी समजून राग येऊ द्या, तरच अशा घटना घडणार नाहीत.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला कोणी हात लावाल तर याद राखा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी भारत काळे, मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक रवींद्र काळे यांनी केले. तर लालासाहेब सालगुडे यांनी आभार मानले.
थंड पाण्यासह नाश्त्याची सोय!
जन आक्रोश मोर्चा असल्याने नेकनूरसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झाले होते. आलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आयोजकांनी जागोजागी थंड पाण्याचे जार, नाश्त्यासाठी पोहे, खिचडी, उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे आलेल्या नागरिकांची कोणतीही गैरसोय झाली नाही.
लोकसंख्या वाढीमुळे उन्माद वाढतोय : आ. जगताप
भारताची जनगणना झाल्यानंतर आकडेवारी समोर आली, तर त्यांची लोकसंख्या चाळीस कोटींपर्यंत पोचलेली असेल हे लक्षात ठेवा. त्यामुळेच हा उन्माद वाढलेला आहे. त्यामुळे जातीपातीत विखरून राहण्यापेक्षा हिंदू म्हणून अन्याय झाल्यानंतर एक व्हा. यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान मान्य नाही. वेगवेगळे जिहाद वाढत आहेत आदी बाबींवर आमदार संग्राम जगताप यांनी वाढत चाललेल्या घटनेचा समाचार घेतला. यावेळी आ. जगताप यांनी मोर्चा आयोजित करणाऱ्या बांधवांना धन्यवाद देत काळे बंधूंचे कौतुक केले. तसेच वाढते जिहाद यावर कटाक्ष टाकत जातीपातीत विखरून राहण्यापेक्षा हिंदू म्हणून एक होऊन राहण्याचे आवाहन केले.