परळी वैजनाथ : परळी शहरातील बँक कॉलनी परिसरातील रहिवासी महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सध्या सुरू असून ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय व पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील विविध तांत्रिक चाचण्यांचे अहवाल गोपनीय ठेवण्यात आले असून नागरिकांनी सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपळा (ता. परळी) येथील रहिवासी महादेव दत्तात्रय मुंडे (वय ३८) यांचा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री वनविभाग कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला होता. या घटनेनंतर मयताचे बंधू अशोक दत्तात्रय मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास सध्या बीड येथील विशेष तपास पथकाकडून सखोलपणे केला जात आहे. तपासाचा भाग म्हणून काही संशयित व्यक्तींवर पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर), बीईओएस (ब्रेन मॅपिंग) आणि नार्को ॲनालिसिस अशा प्रगत मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान, या सर्व चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असून ते केवळ तपास यंत्रणेच्या अधिकृत अभिलेखात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. हे अहवाल कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा प्रसारमाध्यमांना देण्यात आलेले नाहीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
तपासाबाबत सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून चुकीची माहिती प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. तसेच खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तपास यंत्रणेने दिला आहे.