Mohimata Devi Temple pudhari photo
बीड

Mohimata Devi Temple : मोहिमातेचे मंदिर प्राचीन स्थापत्यकलेचा अनोखा वारसा

नवरात्रानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांची मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

गजानन चौकटे

गेवराई : गावाची ओळख केवळ त्याच्या नावाने होत नाही, तर त्या मातीमध्ये दडलेल्या इतिहासाने, पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या श्रद्धेने आणि काळाच्या ओघातही टिकून राहिलेल्या परंपरांनी होते. बीड जिल्ह्यातील गेवराईपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेले मादळमोही हे असेच एक गाव. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वरून या गावाकडे जाता येते. सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची खरी ओळख म्हणजे येथील जागृत देवस्थान श्री मोहिमाता देवी आणि तिच्या मंदिराच्या परिसरात दडलेला प्राचीन वास्तुवैभवाचा वारसा.

गावाच्या नावातच इतिहासाची एक कहाणी दडलेली आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार, मोहिदरा नदीला आलेल्या महापुरात मादळ हे गाव वाहून गेले. त्यानंतर मादळ आणि मोही या गावांच्या इतिहासाशी जोडलेल्या परिसरात पुनर्वसन झाले आणि मादळमोही ही ओळख रूढ झाली, असे सांगितले जाते. नदीच्या पुराने गावाच्या भौगोलिक रचनेत बदल घडवला; मात्र या भूमीची श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा आजही कायम आहे.

मादळमोही म्हटले की सर्वप्रथम आठवते ते श्री मोहिमातेचे मंदिर. अनेक पिढ्यांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या देवस्थानाला परिसरातील बारा गावांच्या धार्मिक जीवनात विशेष स्थान आहे. नवसाला पावणारी देवी, अशी मोहिमातेची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनासाठी मराठवाड्यासह विविध भागांतून भाविक येथे येतात. मोहिमातेच्या प्रकट होण्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. तुळजाभवानी मातेने या ठिकाणी दृष्टांत दिला, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

या मंदिराचे सर्वांत लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या परिसरातील भव्य दगडी बारव. सुमारे 100 बाय 100 फूट आकारमानाची आणि जवळपास 50 फूट खोल असल्याचे सांगितली जाणारी ही बारव प्राचीन जलव्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. बारवेतील दगडी बांधकाम, पायर्‍या, खांब आणि मंदिराची रचना पाहताना तत्कालीन स्थापत्य कौशल्याची कल्पना येते.

बारवेत उतरण्यासाठी उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशमार्ग असल्याचे सांगितले जाते. पायर्‍या उतरून आत गेल्यावर दगडी व्हरांडा दिसतो. या व्हरांड्याला आधार देणारे कोरीव दगडी खांब लक्ष वेधून घेतात. त्यापुढे मध्यभागी असलेल्या चौकोनी भागाच्या पश्चिम दिशेला दगडी कोनाड्यात देवीचे मंदिर आहे. जमिनीच्या पातळीखाली उतरून दर्शन घेण्याचा हा अनुभव भाविकांसाठी वेगळाच असतो.

या वास्तूतील प्रत्येक दगड जणू काही काळाच्या प्रवासाची साक्ष देतो. आज आधुनिक बांधकामांच्या गर्दीत प्राचीन दगडी स्थापत्य जपणारी अशी ठिकाणे इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. या बारवेचा नेमका कालखंड, बांधकामाची शैली आणि ऐतिहासिक महत्त्व यांची पुरातत्त्वीय नोंदींच्या आधारे पडताळणी झाल्यास या वास्तूच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडू शकतो.

मोहिमातेच्या पूजेच्या परंपरेतही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ सांगितले जातात. पूर्वी देवीची पूजा स्वयंभू पाषाणरूपातील तांदळ्याच्या स्वरूपात होत असे, अशी स्थानिक परंपरा आहे. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि देवीची देखणी संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली, असे सांगितले जाते.

  • श्री मोहिमाता हे मादळमोही गावाचे ग्रामदैवत असून, अनेक पिढ्यांपासून भाविकांची देवीवर अपार श्रद्धा आहे. या मंदिराला लाभलेली प्राचीन परंपरा, दगडी बांधकाम आणि बारव हे आपल्या गावाचे वैशिष्ट्य आहे. देवीच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक येतात. यात्रेच्या काळात गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. हा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जतन व्हावा, हीच मोहिमातेच्या चरणी प्रार्थना आहे अशा भावना पुजारी अशोक राऊत यांनी व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT