आष्टी : तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ (मायंबा) गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अंभोरा पोलीस ठाणे व बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत अंभोरा पोलिसांनी उघड केलेली ही दुसरी मोठी टोळी असून, या कारवाईमुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ही टोळी गडावरील प्रचंड गर्दीचा फायदा घेत होती. महिला भाविकांना धक्काबुक्की करणे, बोलण्यात गुंतवणे किंवा गळ्यात हात टाकून हातचलाखीने दागिने लंपास करणे, अशी त्यांची ठरलेली पद्धत होती. या प्रकरणी १९ डिसेंबर २०२५ रोजी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला होता.
सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे तसेच बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे पाथर्डी येथील सुधीर कराळे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आदिनाथ भडके, हरिभाऊ बांगर, कृष्णा नरवडे व जयराम उबे यांनी मोलाची कामगिरी बजावली.