कडा : आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली.
वन कर्मचाऱ्यांनी परिसरातील तलावाच्या आजूबाजूला फेरफटका मारून बिबट्याच्या पाऊलखुणांची (ठसे) गांभीर्याने तपासणी केली. तसेच त्याच्या संभाव्य वास्तव्याच्या खुणांचा शोध घेतला. पाहणीनंतर वनविभागाने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून जनजागृती केली. "नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी बाळगावी," असे आवाहन यावेळी करण्यात आले. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात अथवा तलाव परिसरात एकट्याने जाऊ नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
बिबट्या किंवा त्याची बछडे दिसल्यास त्यांच्याजवळ न जाता त्यांना न डिवचण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बिबट्याची कोणतीही हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने सांगवी पाटण परिसरात सावधगिरीचे वातावरण पसरले असून वनविभागाने या भागावर सतत गस्त ठेवून लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.