Leopard Terror Shirur Kasar
शिरूर कासार : शिरूर कासार तालुक्यातील रूपूर शिवारातील गट क्रमांक २५ मध्ये मंगळवारी (दि. २१) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
विठाबाई शिवराम नेटके (वय ५५) असे जखमी महिलेचे नाव असून, त्या स्वतःच्या शेतात कापूस वेचण्याचे काम करत होत्या. त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. बचावासाठी त्यांनी आरडाओरड करत प्रतिकार केला. त्यावेळी पुढे–मागे हालचाल होत असताना बिबट्याने डरकाळी फोडत घटनास्थळावरून पळ काढला.
महिलेच्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेला असल्यामुळे मोठी इजा टळल्याचे सांगितले जात आहे. जखमी महिलेला तत्काळ शिरूर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून कळविले आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.